रायगडमधल्या बॅनरवर अजित पवार, सुनेत्रा पवारांचा फोटो नसण्याचं खरं कारण अदिती तटकरेंनी सांगितलं

 राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्यावर पक्षफोडीचे वेगवेगळे आरोप होत असताना रायगडमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यक्रमांच्या बॅनरवरून नवीन वादाला तोंड फुटलं आहे. तटकरेंच्या होम ग्राऊंडवरील कार्यक्रमामध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, स्वर्गीय अजित पवार यांच्यासह पक्षश्रेष्ठींचे फोटो गायब झाल्याचे समोर आलं आणि स्टेजवरील बॅनरचा फोटो तुफान व्हायरल झाला. मंत्री आदिती तटकरे यांच्या मतदार संघांतील इंदापुर येथे माणगांव तालुक्यातील नवनिर्वाचित जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांचा सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमात हा वादग्रस्त बॅनर होता.

त्या बॅनरवर होतं काय?

व्यासपीठावरील बॅनरवर खासदार सुनिल तटकरे, मंत्री आदिती तटकरे, माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह स्थानिक नेत्यांचे फोटो लावण्यात आले मात्र या बॅनरवर दिवंगत अजित पवार आणि विद्यमान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह पक्षश्रेष्टींचे फोटो लावण्यात आले नव्हते. रायगडमध्ये राष्ट्रवादीच्या बॅनरवरून पक्षश्रेष्ठींचे फोटो गायब होत असल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरु झाल्या असतानाच यावर अदिती तटकरेंनी स्पष्टीकरण दिलं आहे.

अदिती तटकरेंचं स्पष्टीकरण

दिवसभर या बॅनरची राज्याच्या राजकारणामध्ये चर्चा झाल्यानंतर रात्री 9 वाजून 2 मिनिटांनी अदिती तटकरेंनी त्यांच्या फेसबुक पेजवरुन पोस्ट करुन या बॅनवर अजित पवार आणि सुनेत्रा पवारांचा फोटो का नव्हता हे सांगितलं. “स्थानिक पातळीवर पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून कार्यक्रम घेतले जातात, असे अनेक कार्यक्रम दिवसभरात होत असतात. अशाच एका ग्रामपंचायत पातळीवरील कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिवंगत नेते अजितदादा पवार आणि राष्ट्रीय अध्यक्षा तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राकाकी यांचा फोटो नव्हता, याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते,” असं अदिती तटकतरेंनी म्हटलं आहे. तसेच, “अजितदादा असतील, सुनेत्राकाकी असतील यांचं आमच्या मनातील स्थान अढळ आहे. बॅनरवरील फोटोतून आम्हा सगळ्याच कार्यकर्त्यांची निष्ठा ठरवू नये,” असंही अदिती तटकरेंनी म्हटलं आहे.

आमच्या चुकीबद्दल आमचे कान पकडण्याचा अधिकार

“तरी, यानिमित्ताने एक बरे झाले- स्थानिक कार्यक्रमातील स्थानिक पातळीवर घडलेल्या एका चुकीचा मुद्दा बनवणारी यंत्रणा कशी काम करते हे आमच्या लक्षात आले. हा मुद्दा चवीने चघळणाऱ्यांना दादा हयात असताना त्यांच्यावर केलेल्या टीकेबद्दल मनातून किती पश्चाताप व्यक्त करावा लागत असेल देव जाणे! बाकी काकींना पक्षाच्या कुटुंबप्रमुख म्हणून आमच्या चुकीबद्दल आमचे कान पकडण्याचा अधिकार आहेच,” असंही अदिती यांनी पोस्टच्या शेवटी म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *