पगार थकित राहिल्याच्या संतापातून एका डम्पर चालकाने थेट ठेकेदार मालकाची कार डम्परने तब्बल १० ते १५ फूट फरफटत नेत नुकसान केल्याची मोठी घटना डोंबिवली पश्चिमेतील राजनगर परिसरात घडली आहे. या प्रकाराचा व्हिडीओ सध्या समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून चर्चेचा विषय ठरला आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत टिटवाळा ते माणकोली मोठागाव बाह्यवळण रस्त्याचे काम सुरू आहे. या प्रकल्पांतर्गत विविध ठेकेदारांकडून मोठ्या प्रमाणात कामगार व वाहनचालक काम करत आहेत. मात्र, गेल्या महिनाभरापासून काही कामगारांचे पगार थकित असल्याची तक्रार आहे. वारंवार मागणी करूनही वेतन न मिळाल्याने कामगारांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कारला फरफटत नेलं
मंगळवारी २४ मार्च रोजी या मार्गावर माती वाहतूक करणारा अवजड डम्पर जात असताना संबंधित ठेकेदाराची कार रस्त्याच्या मध्यभागी उभी होती. मालक कामाच्या पाहणीसाठी बाजूला गेला असताना डम्पर चालकाच्या नजरेस ही कार पडली. पगार न मिळाल्याच्या संतापातून चालकाने डम्परने कारला पुढून ढकलत अंदाजे १० ते १५ फूट फरफटत नेले.
व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
यानंतर ही कार समोर उभ्या असलेल्या दुसऱ्या डम्परला धडकून अडकली. या घटनेत कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने वाहनात कोणीही नसल्याने जीवितहानी टळली. घटना घडल्यानंतर संबंधित चालक घटनास्थळावरून निघून गेला. दरम्यान, हा संपूर्ण प्रकार काही कामगारांनी मोबाईलवर चित्रीत केला असून व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणी विष्णुनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी तपास करत आहेत. दरम्यान, प्राधिकरणाकडून देयके मंजूर होण्यात विलंब होत असल्याने ठेकेदारांवर आर्थिक ताण निर्माण झाला असून त्याचा परिणाम कामगारांच्या वेतनावर होत असल्याची चर्चा कामगारांमध्ये सुरू आहे.
दरम्यान, महिना उलटला तरी कामावरील कामगारांना आपल्या कामाचा पगार मिळाला नाहीय. कष्टकरी वर्गातील हे कामगार आपल्या मालक ठेकेदाराकडे दररोज पगार देण्याची मागणी करत आहेत. सतत मागणी करुनही पगार मिळत नसल्याच्या कारणातून ही घटना घडली आहे.
