सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली येथे एका बांधकाम व्यवसायिकाचा बंदुकीच्या गोळीने हत्या करण्यात आल्याने वातावरण तापलं आहे. सुशांत जनार्दन दळवी (मूळ रा. कळसुली तालुका कणकवली) असं या बांधकाम व्यवसायिकाचं नाव आहे. काल शुक्रवारी सकाळच्या सुमारास दळवी यांचा मृतदेह कणकवली जवळ मुरे डोंगरी येथे मिळाला आहे. या घटनेचे वृत्त कळताच घटनास्थळी तात्काळ अप्पर पोलीस अधिक्षक नयोमी साटम, पोलीस उपविभाग अधिकारी घनश्याम आढाव आदी पोलीस अधिकारी तसेच तपास यंत्रणांची पथके घटनास्थळी दाखल झाली होती.
मुकादमानेच केली हत्या
अवघ्या काही तासात या हत्या प्रकरणाचा तपास करत ही हत्या दळवी यांचा मुकादम अमर सत्यवान कदम यानेच केल्याचा उलगडा पोलिसांनी केला आहे. कुडाळ ओरस परिसरातील असलेल्या अमर कदमला अटक करण्यात आली आहे. संशयित आरोपी अमर याने गोळी घालून हत्या केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. सुशांत दळवी व अमर कदम हे दोघेही शिकारीसाठी गेले होते. दळवी यांना शिकारीचा छंद होता. या घटनेनंतर अमर याच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. मात्र, ही हत्या कोणत्या उद्देशाने केली? ते अद्याप समजू शकलं नाहीय. याचा कणकवली पोलीस तपास करत आहेत.
घटनास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे
कणकवली पोलीस निरिक्षक तेजस नलवडे, गुन्हा अन्वेषण शाखेचे उपनिरिक्षक अनिल हाडळ, फॉरेन्सिक लॅबचे पथक, गुन्हा अन्वेषण पथक, जिल्हा गुन्हा अन्वेषण शाखेचे पथक आदी तपासपथके घटनास्थळी दाखल झाली होती. दळवी यांचं पार्थिव पुढील कार्यवाईकरिता काल दुपारनंतर कोल्हापूर येथे पाठवण्यात आलं आहे.
याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून या सगळ्या प्रकरणामागे अजून कोणाचा हात आहे का? या सगळ्याचा अधिक तपास कणकवली पोलीस करत आहेत. दरम्यान, संशयित आरोपी अमर कदमला अटक केल्यानंतर माजी आमदार वैभव नाईक आपल्या सहकाऱ्यांसह कणकवली पोलीस स्थानकात काल शुक्रवारी संध्याकाळी उशिरा दाखल झाले होते. त्यांनी या सगळ्या प्रकरणाचा तपास करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे.
