सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथे एका प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाचा संशयास्पद पार्थिव आढळल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेचं वृत्त कळताच कणकवली पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून प्रकरणाचा पंचनामा करण्याचं काम सुरू आहे. सुशांत जनार्दन दळवी (मूळ राहणार कळसुली तालुका, कणकवली) असं या बांधकाम व्यवसायिकाचं नाव आहे. या घटनेचं वृत्त कळताच घटनास्थळी अप्पर पोलीस अधिक्षक नयोमी साटम, पोलीस उपविभाग अधिकारी घनश्याम आढाव यांच्यासह दाखल झाले आहेत.
डोक्यावर गंभीर इजा
सुशांत दळवी यांच्या पार्थिवाच्या डोक्यावर गंभीर इजा झाली असून बंदुकीने गोळी लागल्यासारखी निशाणी असल्याची चर्चा आहे. प्रथमदर्शनी हा मृत्यू संशयास्पद हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. कणकवली शहरातील सेंट्रींगचे कॉन्ट्रॅक्टर सुशांत दळवी यांचा अज्ञात व्यक्तीने गोळी झाडून हत्या केल्याचा संशय असून त्यांचं पार्थिव आज सकाळी मुरे डोंगरी येथे मिळालं आहे. सुशांत दळवी हे कणकवली शहरातील बांधकाम व्यवसायिक आहेत. या सगळ्या प्रकरणाने संपूर्ण जिल्ह्यात भितीचं वातावरण पसरलं आहे. हा मृत्यू घातपात आहे की, अजून काही, याबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळाली नाहीय. तरी या मृत्यू प्रकरणाचं गूढ वाढलं आहे. हा मृत्यू नेमका कशामुळे झाला याची माहिती पोलीस घेत आहेत. या प्रकरणाने परिसरात खळबळ उडाली आहे.
घटनास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त
कणकवली पोलीस निरिक्षक तेजस नलवडे, गुन्हा अन्वेशनचे उपनिरिक्षक अनिल हाडळ, फॉरेन्सिक लॅबचे पथक, गुन्हा अन्वेशनचे पथक, जिल्हा गुन्हा अन्वेषण शाखेचे पथक आदी तपासपथके घटनास्थळी दाखल आहेत. दरम्यान, सुशांत दळवी यांची हत्या झाल्याच्या घटनेची माहिती कळताच माजी आमदार वैभव नाईक, नगराध्यक्ष संदेश पारकर, उपनगराध्यक्ष सुशांत नाईक, हरकुळ बुद्रुक सरपंच आनंद ठाकूर, वागदे सरपंच संदीप सावंत, सचिन सावंत, सचिन आचरेकर, जावेद शेख, आतीष जेठे, विशाल डामरी, राज नलावडे आधी नागरिक घटनास्थळी दाखल झाले आहेत. पुढील तपास सुरु आहे.
