पिंपरी- चिंचवडमध्ये एक हृदयद्रावक आणि वेदनादायक घटना उघडकीस आली आहे. अविवाहित तरुणीने घरीच बाळाला जन्म दिल्यानंतर काही तासांतच आई आणि नवजात बाळ दोघांचाही मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. शहरातील चिंचवडे नगर, चिंचवड येथे राहणारी २२ वर्षीय तरुणी गरोदर असल्याची माहिती कुटुंबीयांपासून लपवण्यात आल्याचं समोर येत आहे.
घरातच झाले बाळंतपण
मंगळवारी २४ मार्च रोजी सकाळी अचानक तिची प्रकृती बिघडली आणि घरातच तिचे बाळंतपण झाले. मात्र योग्य वैद्यकीय मदत वेळेत न मिळाल्याने तिची तब्येत झपाट्याने खालावली. तात्काळ तिला आणि बाळाला रावेतमधील एका खासगी रुग्णालयात नेण्यात आलं. डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर तरुणीची प्रकृती गंभीर असल्याचं लक्षात येताच तिला पुढील उपचारासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात हलवण्यात आले.
माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू
दरम्यान, नवजात बाळाची स्थितीही चिंताजनक बनली होती. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार बाळाला यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात हलविण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र उपचार सुरू असतानाच सायंकाळी बाळाचा मृत्यू झाला. आईवरही ससून रुग्णालयात उपचार सुरू होते, पण तिची प्रकृती अधिकच खालावत गेली आणि सायंकाळी तिचाही मृत्यू झाला. या घटनेमुळे वेळेवर उपचार न मिळाल्यास होणारे गंभीर परिणाम पुन्हा एकदा समोर आले आहेत. चिंचवड पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
