मिरा रोडच्या सिल्वर पार्क येथील एका इमारतीत बुधवारी रात्री ३७ वर्षीय विवाहितेची चाकूने वार करत हत्या करण्यात आली. ही महिला घरकाम करत असलेल्या तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये तिची हत्या करण्यात आली. टीव्ही अभिनेता आशिष मेश्राम याने महिलेचा खून केल्याचा आरोप आहे. हत्येनंतर पळून गेलेल्या आरोपीला मिरा रोड पोलिसांकडून शुक्रवारी विशाखापट्टणम येथून अटक करण्यात आली आहे. लैंगिक सुखाची मागणी धुडकावल्याने आशिषने तिचा जीव घेतल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे.
नेमकं काय घडलं?
काशिमिरा येथे वास्तव्यास असलेल्या सुमन कांबळे या सिल्वर पार्क येथील ‘चंद्रेश आर्केड’ इमारतीत गेल्या काही महिन्यांपासून घरकाम करत होत्या. बुधवारी सायंकाळी त्या नेहमीप्रमाणे कामासाठी गेल्या होत्या. यावेळी घरकाम करत असलेल्या घराच्या दरवाजातच त्या गंभीर जखमी अवस्थेत असल्याचे शेजारी राहणाऱ्या महिलेला दिसून आले. त्यांनी इतर नागरिकांना बोलावून, त्यांना जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र त्यापूर्वीच सुमन यांचा मृत्यू झाला होता.
हल्ला झाला, त्यावेळी त्या एकट्याच घरात होत्या. त्यांच्या मान, छाती आणि पोटावर सपासप वार करण्यात आले. मीरा रोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सोसायटीमध्ये शिरताना आणि तिथून बाहेर पडताना अत्यंत वेगात असल्याचं दिसलं. त्यावरुन हा गुन्हा “एक पूर्वनियोजित कट” असल्याचं दर्शवतं. सध्या ट्रान्झिट रिमांडवर असलेल्या आरोपीला या आठवड्याच्या अखेरीस शहरात आणलं जाईल आणि त्यानंतरच घटनेचा नेमका क्रम स्पष्ट होईल, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं.
लैंगिक सुखाची मागणी
आरोपीने यापूर्वी मयत महिलेकडे लैंगिक सुखाची मागणी केली होती, मात्र तिने वारंवार फेटाळून लावल्याच्या वृत्तालाही पोलिसांनी दुजोरा दिला. ज्या फ्लॅटमध्ये ही हत्या झाली, तिथे पूर्वी केवळ आशिषचा मोठा भाऊच राहत असे; परंतु साधारण दीड वर्षांपूर्वी आशिषनेही तिथे राहायला सुरुवात केली.
चार मुलांची आई
सुमन कांबळे यांच्या पश्चात पती आणि चार मुलं असा परिवार आहे. पती चप्पल दुरुस्तीचं काम करतो, तर मोठा मुलगा एका खाजगी कंपनीत काम करतो. सुमन ८-९ घरांमध्ये घरकाम करुन आपल्या कुटुंबाला हातभार लावत असे. ती गेल्या तीन वर्षांपासून आशिष मेश्रामच्या घरी काम करत होती.
एफआयआरनुसार, जानेवारी महिन्यात आशिषने सुमनच्या दुसऱ्या मुलाला फोन केला होता. सुमनने आपल्याकडे काम करणं बंद केलं किंवा आपल्या लैंगिक मागणीला नकार दिला, तर तिला जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती.
याच वेळी, त्या मुलाने आपल्या आईकडे याविषयी विचारणा केली. अखेरीस सुमनने आपल्यावर ओढवलेल्या गंभीर प्रकाराविषयी मोकळेपणाने सांगितलं. आशिष आपल्याकडे लैंगिक सुखाची मागणी करत असल्यामुळेच आपण त्याच्या घरी काम करणं बंद केल्याचं सांगितलं.
आशिषला केलेली मारहाण
हे ऐकून तिचा मुलगा संतापाने पेटून उठला. आशिषचा शोध घेत त्याच्या फ्लॅटमध्ये गेला; परंतु त्याला आशिष तिथे आढळला नाही. काही दिवसांनंतर जेव्हा त्या मुलाला आशिष मिरा रोड परिसरात दिसला, तेव्हा त्याने आशिषला बेदम मारहाण केली आणि आपल्या आईपासून दूर राहण्याची त्याला ताकीद दिली.
त्यानंतर आशिषच्या मोठ्या भावाने सुमनला आश्वस्त केलं की, आपला भाऊ आता आपल्यासोबत राहत नाही आणि त्यामुळे तिने त्या घरात पुन्हा कामावर रुजू व्हावे. बुधवारी रात्री जेव्हा सुमन कामासाठी त्यांच्या फ्लॅटवर गेली, तेव्हा आशिषने घरात प्रवेश केला आणि तिची हत्या केल्याचा आरोप आहे.
