सध्या महाराष्ट्राच्या काही भागांत आंशिक ढगाळ वातावरण आहे. ही स्थिती पुढील एक आठवडाभर कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. राज्याच्या दक्षिण भागात दुपारनंतर स्थानिक स्वरूपात वादळी पाऊस पडू शकतो. हा पाऊस मुख्यतः कर्नाटक आणि तेलंगणा सीमेवरील भागांत जास्त दिसण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर कोकणात अचानक गारांचा पाऊस पडला. तसेच राज्यात 2 दिवस मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
राज्यातील विविध भागात 30 आणि 31 मार्चला मेघगर्जनेसह पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दरम्यान लांजा, रत्नागिरीसह काही भागात आज गारांचा पाऊस पडला आहे. यामुळे आंबा, काजू बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे. आंब्याला नुकताच आलेला मोहर यामुळे गळून पडलाय. आता काय नुकसान भरपाई मिळणार? याची आंबा बागायतदार वाट पाहत आहेत.
30 मार्चला कोणत्या भागांत वादळी पाऊस आणि गारपीट?
30 मार्च रोजी खानदेश, मराठवाडा, पश्चिम विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पाऊस, वादळी वारे आणि काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. दुपारनंतर आभाळ दाट होऊन विजांचा कडकडाट, जोरदार वारे आणि पाऊस पडेल. उर्वरित विदर्भातही हवामानात बदल होऊ शकतो. या दिवशी शेतकऱ्यांना विशेष सावधानी बाळगावी लागणार आहे कारण पिकांना नुकसान होण्याची भीती आहे.
31 मार्चलाही हवामानाचा प्रभाव कायम
31 मार्च रोजी देखील राज्याच्या काही भागांत हीच वादळी हवामानाची स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. मेघगर्जना, वादळी वारे, पाऊस आणि गारपीट यांचा परिणाम काही जिल्ह्यांत दिसू शकतो. हवामान विभागाने दिलेल्या प्राथमिक अंदाजानुसार, ही स्थिती मुख्यतः दुपारनंतर निर्माण होईल. शेतकऱ्यांनी हवामान अपडेट नियमित तपासण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाचे महत्वाचे आवाहन
हवामानाच्या अद्ययावत अंदाजाकडे लक्ष ठेवा. सध्या रब्बी पिकांची काढणी सुरू आहे. त्यामुळे काढणी झालेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवा किंवा चांगल्या प्रकारे झाकून ठेवा, असे आवाहन कृषी विभागाने शेतकऱ्यांना स्पष्ट आवाहन केले आहे की, वादळी वारे, पाऊस आणि गारपीट यांपासून पिकांचे नुकसान टाळण्यासाठी योग्य खबरदारी घ्या. शेतीची कामे हवामानानुसार आखा, असे आवाहन करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी?
शेतकरी बांधवांनी पुढील काही दिवस हवामान विभागाच्या बातम्या नियमित ऐकाव्यात किंवा अॅपद्वारे तपासाव्यात. पिके कापल्यानंतर लगेच सुरक्षित ठिकाणी नेणे गरजेचे आहे. वादळी पावसामुळे पिके भिजू नयेत किंवा गारांनी नष्ट होऊ नयेत यासाठी योग्य व्यवस्था करा. हवामान विभागाने सांगितल्याप्रमाणे, 30 आणि 31 मार्च या दोन दिवसांत विशेष सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. अशा प्रकारे सर्व शेतकरी सज्ज राहिले तर नुकसान टाळता येईल, असा सल्ला देण्यात आलाय.
