एल निनो सक्रीय, तरीही मुंबईत कुठून आला इतका वादळी पाऊस?

पॅसिफीक महासागरात तयार होणाऱ्या हवामान प्रणालीचा भारतातील हवामानावर नकारात्मक परिणाम होईल असा स्पष्ट इशारा मान्सून दाखल होण्याआधीच देण्यात आला. एल निनो सक्रीय असल्यामुळं यंदा पावसाचं प्रमाण कमी असेल, हवामानात असंख्य बदल होतील, इतकंच काय तर काही ठिकाणी दुष्काळाचेही संकेत वर्तवण्यात आले. मात्र जुलै महिना सुरू झाला आणि पावसानं हाहाकार माजवला. इतका, की कोण कुठला एल निनो? असाच प्रश्न अनेकांना पडला.

वादळी पाऊस, ढगफुटीसदृश्य पावसामुळं महाराष्ट्रासह भारतातील अनेक राज्यांमध्ये हाहाकार माजवणारा पाऊस झाला. मुंबई, नवी मुंबई, कोकण किनारपट्टीच पावसानं आठवडाभर उसंतच घेतली नाही. मुंबईत इतका पाऊस झाला की, जुलै महिन्याची सरासरी या आठवड्याभराच्या पावसानं भरून काढली. तिथं शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांची पाणीपातळीसुद्धा सातत्यानं वाढत राहिली. पण, एल निनोचा इशारा असताना इतका पाऊस आला कुठून? हवामान तज्ज्ञांच्याही भुवया या एका प्रश्नानं उंचावल्या. पॅसिफिक महासागरातील हालचाली किंवा जागतिक तापमानवाढ हीच यामागची कारणं नसून, हिंदी महासागरातील उलथापालथ किंवा शास्त्रीय भाषेत सांगावं तर इंडियन ओशन डायपोलमुळंही हा पाऊस प्रमाणाबाहेर बरसला.

एल निनोचा असाही प्रभाव?

सहसा एल निनो सक्रीय असताना पॅसिफिक महासागराच्या पाण्याचं पृष्ठावरील तापमान वाढतं. परिणामी भारतातील मान्सून यापुढं फिका पडतो. यंदाच्या वर्षी ही स्थिती आढळली खरी, पण जागतिक तापमानवाढीमुळं याउलट परिस्थिती निर्माण झाली. जिथं अनेक दिवस पाऊस पडण्याऐवजी तो ठराविक कालावधीत ढगफुटीच्या स्वरुपात बरसला. जिथं एल निनोसुद्धा फिका पडला. उष्ण हवेमध्ये आर्द्रतेचं प्रमाण अधिक असल्यामुळं पावसाच्या या क्रियेला वेग आणि बळ मिळालं.

अतिवृष्टीमागचं आणखी एक कारण म्हणजे…

मुंबईत झालेल्या या अतिवृष्टीसम पावसामागचं आणखी एक कारण म्हणजे पश्चिम आशियातील तापमानवाढ आणि अरबी समुद्रातील वाऱ्यांमध्ये झालेला बदल. ज्यामुळं मान्सूनचे ढग पुढे आले आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होत राहिलं. अरबी समुद्रासह बंगालच्या उपसागरात एकाच वेळी बाष्पीभवनाची क्रिया घडते तेव्हा भारतात आणि प्रामुख्यानं मुंबईत अतिवृष्टीसम पाऊस होतो. इथंही हेच चित्र पाहायला मिळालं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *