अवकाळी पावसाचं सावट असणाऱ्या महाराष्ट्राच्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये आता तापमानवाढीस सुरुवात झाली असून, अनेक जिल्ह्यांमध्ये पारा चाळीशीपार गेला आहे. विदर्भात उष्णतेचा दाह अधिक प्रमाणात जाणवत असून, याच विदर्भाच्या पूर्वेला मात्र वादळी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. एकिकडे उष्ण वातावरण आणि दुसरीकडे पावसाचा मारा अशीच स्थिती विदर्भात असल्यानं नागरिकांना यंत्रणेनं सतर्क केलं आहे.
राज्यात सध्या अकोला, वर्धा, अमरावती इथं पारा 40 अंश सेल्सिअसपलिकडे गेला आहे. तर निचांकी तापमानाची नोंद निफाडमध्ये करण्यात आली असून, इथं पारा 16 अंशांवर असल्यानं दिवस मावळतीला गेल्यानंतर हवेत गारठा जाणवत आहे. पुढील 24 तासांमध्ये मराठवाडा आणि विदर्भातील काही ठिकाणी हलक्या पावसाचा शिडकावा असेल, तर वर्धा, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर इथं मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पवासाचा इशारा देण्यात आला आहे.
कोकणात पावसाची हजेरी!
मागील 24 तासांमध्ये, गुरुवारी दुपारनंतर रत्नागिरीच्या लांजा, राजापूर, संगमेश्वर, चिपळूण इथं मेघगर्जनेसह पावसानं हजेरी लावली. यामुळं आता आंबा आणि काजूसारख्या फळांचं नुकसान झाल्याचं चित्र आहे. दरम्यान रत्नागिरी आणि नजीकच्या भागामध्ये सध्या पावसासदृश्य वातावरण पाहायला मिळत आहे. पुढील 24 तासांमध्येसुद्धा दुपारनंतर असीच स्थिती उदभवू शकते. तर, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबई शहर, उपनगर, ठाणे आणि पालघरमध्ये दमट हवामानात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
देशभरात कसं असेल हवामान?
सुट्टीच्या निमित्तानं विविध राज्यांमध्ये पर्यटकांची ये- जा वाढली असून, हवामानातील बदलांची माहिती घेऊनच प्रवास करण्याचा सल्ला यंत्रणा देत आहेत. केंद्रीय हवामानशास्त्र विभाग अर्थात आयएमडीच्या माहितीनुसार पुढचे 24 तास दोन पश्चिमी झंझावात सक्रिय असल्या कारणानं देशाच्या अनेक भागांमध्ये वादळी पावसाचं सत्र सुरू होणार आहे. प्रामुख्यानं हिमालय क्षेत्र, उत्तर भारत, पूर्वोत्तर राज्यांसह दक्षिण भारतात मेघगर्जनेसह पाऊस आणि वादळी वाऱ्याचा इशारा देण्यात आहे. 27 ते 31 मार्चदरम्यान जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये पावसासह अतीव उंचीच्या ठिकाणी बर्फवृष्टी होऊ शकते असाही प्राथमिक अंदाज आहे.
