लहान मुलांच्या बाबतीत कधी कोणती अघटित घटना घडेल सांगता येत नाही. अशाच पद्धतीने कोल्हापुरात एका बालिकेला खेळता खेळताच एका छोट्याशा गोष्टीमुळे आपला जीव गमवावा लागला आहे. करवीर तालुक्यातील सरनोबतवाडी येथे ही घटना घडली आहे. या ठिकाणी राहणाऱ्या बंडरोळी कुटुंबात चार वर्षीय अनन्या प्रकाश बंडरोळीचा दुःखद अंत झाला आहे. घरात खेळताना अचानक तिला उचकी लागून ती बेशुद्ध झाली होती. ही घटना गुरुवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत करण्यात आली आहे.
नेमकं काय झालं?
सीपीआर पोलिस चौकीतून मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, प्रकाश बंडरोळी हे मूळचे कर्नाटकातील रहिवासी असून, बांधकामासाठी ट्रॅक्टर-ट्रॉली पुरवतात. त्यांच्या पत्नीसह अनन्या आणि भावाची मुले त्यांच्या घरी होते. गुरुवारी सकाळी प्रकाश बंडरोळी कामासाठी गेले होते. दुपारी अनन्या भावंडांसोबत खेळत असताना अचानक तिला उचकी लागून ती बेशुद्ध पडली. त्यामुळे तिला तात्काळ सीपीआर रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वी तिचा मृत्यू झाल्याचे घोषित केला. पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करून शवविच्छेदनासाठी पार्थिव पाठवले आहे. अहवाल मिळाल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण समोर येईल.
