तळकोकणातून कार्ल्यातील एकविरा देवीच्या दर्शनासाठी आणि पालखी सोहळ्यासाठी तळकोकणासह मुंबईतूनही अनेक कोळीवाड्यांच्या पालख्या गडावर दाखल झाल्या होत्या. आगरी आणि कोळी समुदायासाठी आद्यदैवता अरणाऱ्या एकविरा देवीच्या चैत्र यात्रेच्या निमित्तानं गडावर गर्दी होती. इतरही अनेक भाविक इथं यात्रोत्सवासाठी दाखल झाले होते. मात्र या भक्तिमय वातावरणाला गालबोट लावणारी एक घटना घडली आणि क्षणात सारं बिघडलं.
कार्ला येथे आई एकविरेच्या चैत्र यात्रेला गालबोट लावणारी घटना दोन गटातील बाचाबाचीमुळं घडली, ज्याचं रुपांतर पुढं तुंबळ राड्यात झालं. यावेळी तणाव इतका वाढता की, तिथं असणाऱ्यांनी हाताला येईल ते, अगदी दगडफेकही केल्याचं पाहायला मिळालं. सदर घटनेचा हादरवणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या हाणामारीमध्ये 15 हून अधिक भाविक जखमी झाले, तर काहींच्या हातापायाला गंभीर इजा झाली.
वादाचं कारण काय?
चैत्र यात्रेनिमित्त कार्ला डोंगरावर मुंबई, रत्नागिरी, पनवेल, अलिबाग, भिवंडी आणि ठाण्यातून अनेक पालख्या दाखल झाल्या होत्या. मात्र पालखी पुढे नेण्याच्या कारणावरून 26 मार्च रोजी रात्री उशिरा पनवेल कोळीवाडा आणि कल्याण कोळीवाडा या दोन गटांमध्ये वाद पेटला आणि त्याचं रुपांतर हाणारी, दगडफेकीमध्ये झालं अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. वाद इतका चिघळला की पोलिसांनी यामध्ये हस्तक्षेप केल्यानंतर कुठं परिस्थिती नियंत्रणात आली.
हाणामारीचं प्रकरण मिटत नाही तोच पुन्हा एक वाद उफाळून आला. जिथं काही हुल्लडबाज भाविकांनी दगडफेक करून गडावरील काही गवताळ भागाला आग लावली. त्यामुळे कार्ला एकविरा यात्रेला गालबोट लागल्याचं दिसून आलं. यानंतर स्थानिक कार्ला वेहेरगाव ग्रामस्थांनी पोलीस प्रशासनावर नाराजी व्यक्त केली. इथं एक तासानं होमगार्ड घटनास्थळी दाखल झाले. मात्र होमगार्डचं कोणीही ऐकण्यास तयार नसल्याने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात असल्याचं दिसून आलं.
