कॉलेजमधून निघताना शिक्षिकेच्या बाईकला डंपरची धडक; फरफटत नेल्याने जागीच मृत्यू, घटनेनं कॉलेजवर शोककळा

 कराड आणि मलकापूरमध्ये बुधवारी रात्री झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये एका प्राध्यापिकेसह भाजी विक्रेती महिला जागीच ठार झाली, तर १३ वर्षांच्या मुलीसह तीन महिला गंभीर जखमी झाल्या. कॉलेज सुटल्यानंतर सायंकाळी कराड बसस्थानकाकडे जात असताना दुचाकीला भरधाव डंपरने धडक देऊन फरफटत नेल्याने प्रा. सुषमा आनंदा कीर्तने जागीच ठार झाल्या. मलकापूरमध्ये दुचाकीला धडक देऊन भरधाव कार भाजी मंडईत घुसली. कारने चिरडल्याने भाजी विक्रेती महिला जागीच ठार असून तीन महिला जखमी झाल्या.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कराड येथील यशवंतराव चव्हाण सायन्स कॉलेजमध्ये वनस्पतिशास्त्र विभागातील प्राध्यापिका सुषमा आनंदा कीर्तने या बुधवारी कॉलेज सुटल्यानंतर सायंकाळी सहाच्या सुमारास दुचाकीवरून बसस्थानकाकडे निघाल्या होत्या. त्यावेळी डंपरने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. धडक दिल्यानंतर डंपरने दुचाकीसह कीर्तने यांना दहा ते बारा फूट फरफटत नेल्याने त्या जागीच ठार झाल्या. कॉलेजमधील त्या ज्येष्ठ प्राध्यापिका होत्या. काही दिवसांपूर्वीच त्यांनी पीएचडी मिळवली होती.

दुसरीकडे, मलकापूरच्या भाजी मंडईत घुसलेल्या भरधाव कारने चिरडल्याने उषा बाळू रौंदाळे (रा. मलकापूर, ता. कराड) ही महिला ठार झाली. त्या भाजी विक्रेत्या होत्या. या अपघातात रूपाली मारुती पाटील (वय ३७, रा. काले, त. कराड), दीपाली सचिन हुलवान (वय ३८) आणि ज्ञानदा सचिन हुलवान (वय १३, सध्या रा. मलकापूर, मूळ रा. येडेमच्छिंद्र, ता. वाळवा, जि. सांगली), या तीन महिला देखील गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर कृष्णा रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

भाजी मंडईत घुसलेली कार एक महिला चालवत होती, अशी माहिती घटनास्थळावरून समजली. दुचाकीला धडक दिल्यानंतर महिलेचा ताबा सुटला आणि भरधाव कार थेट भाजी मंडईत घुसली. महिलांना उडवल्यानंतर इमारतीला धडकून कार थांबल्याने मोठा अनर्थ टळला. दोन्ही अपघातांची नोंद कराड शहर पोलीस ठाण्यात झाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *