17 व्या वर्षी नात्यातील तरुणीशी गैरकृत्य, ‘खरात फाईल्स’ समोर, ‘कॅप्टन’पद मिरवणारा भोंदू निघाला जहाजावरचा सफाई कामगार

लैंगिक अत्याचारांचे सात गुन्हे नोंद असलेला संशयित अशोक खरात उर्फ कॅप्टन याने भोंदूगिरीच्या व्यवसायात येण्यापूर्वी किंबहुना वयाच्या सतराव्या वर्षीच एका तरुणीसोबत गैरकृत्य केल्याची माहिती समोर येत आहे. तेव्हापासून घरातून ‘करिअर’च्या नावाने गायब झालेल्या खरातने पश्चिम बंगालमध्ये भोंदूगिरीचे धडे गिरवून त्यातूनच अनेकांना गंडा घातला आहे. विशेष म्हणजे, खरात हा ‘मर्चन्ट नेव्ही’मध्ये कॅप्टन नव्हे, तर जहाजावर सफाई कामगार म्हणजेच चतुर्थ श्रेणी कर्मचारी होता, अशी माहिती पोलिस दलातील खात्रीलायक सूत्रांनी दिली.

जीवन कहाणीही संशयास्पद

भोंदूगिरीच्या आडून महिलांवर अत्याचार करणाऱ्या संशयित खरातची जीवन कहाणीदेखील तितकीच संशयास्पद आहे. सन १९६५च्या दरम्यान जन्म झालेल्या खरातने त्याच्या वयाच्या सतराव्या वर्षी नातलगांपैकी एका तरुणीसोबत गैरकृत्य केल्याची गोपनीय माहिती पोलिसांकडे आहे. अर्थात, त्याप्रकरणी कोणतीही कायदेशीर फिर्याद तेव्हा आणि आता दाखल नाही. परंतु, त्याच्या तेव्हाच्या कुकर्मानंतर नोकरीच्या नावाखाली खरात घरातून गायब झाला.

अचानक त्याने ‘मर्चन्ट नेव्ही’त काम करीत असल्याचे सांगत थेट ‘कॅप्टन’ असल्याची पुडी सोडली. त्यामुळे काही दिवसांतच नातलगांसह ग्रामस्थ व नागरिकांमध्ये तो ‘कॅप्टन’ नावाने प्रचलित झाला. जहाजावर सफाई कामगार असलेल्या खरातने बँकॉकसह इतर देशात काम केले. तेथेही अय्याशी करणाऱ्या खरातने काही वर्षांनी पश्चिम बंगालमध्ये वास्तव्य सुरू केले. जहाजांवर कामे करून बंगालमध्ये वास्तव्य करताना त्याने तेथील गुरूंकडून भोंदूगिरीचे धडे गिरविण्यास सुरुवात केली. ठोकताळे आणि काही मुद्द्यांद्वारे नागरिकांना गंडवून पूजाविधी, भविष्याच्या नावाखाली ‘उद्योग’ थाटण्याचा निर्णय घेतला.

सन १९९७-९८मध्ये नाशिकच्या कॅनडा कॉर्नर परिसरात कार्यालय सुरू करीत त्याने भोंदूगिरीला सुरुवात केली. गंभीर बाब म्हणजे, संशयिताने कुकर्म करताना महाविद्यालयीन विद्यार्थिनींसोबतही गैरकृत्ये केली आहेत. शैक्षणिक सल्ला, करिअरच्या नावे पूजा व इतर गोष्टी सांगत त्याने अंगलट आणि अत्याचार केल्याचे दाखल गुन्ह्यांवरून स्पष्ट होत आहे. यासह खरातवर अंधविश्वास ठेवत पीडितांच्या नातलगांसह आप्तेष्टांनीच त्यांना खरातच्या जाळ्यात पोहोचविल्याचेही पोलिस तपासात समोर येत आहे.

‘स्पाय कॅमेरा’ महत्त्वपूर्ण

संशयित खरातने त्याच्या कार्यालयातील कर्मचाऱ्याच्या पत्नीसोबतच अत्याचार केल्याने ‘त्या’ कर्मचाऱ्याने मित्राच्या मदतीने खरातच्या कार्यालयात ‘स्पाय कॅमेरा’ बसवला. त्यामुळे गत काही वर्षांतील खरातच्या कुकर्मांची ‘व्हिडीओ फाइल’ तयार झाली. ‘त्या’ कर्मचाऱ्याने बऱ्यापैकी हे प्रकरण उघड करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, राजकीय व प्रशासकीय शक्तींमुळे त्याचा प्रयत्न यशस्वी होत नव्हता. अखेर मुख्यमंत्री कार्यालयातून सूत्रे फिरली आणि नाशिक पोलिसांनी खरातला बेड्या ठोकल्या. तेव्हाही ‘स्पाय कॅमेरा’तील डेटानुसार तयार झालेला ‘पेन ड्राइव्ह’ या सर्व गुन्ह्यांमागील मुख्य पुरावा ठरला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *