अनेक शालेय आणि महाविद्यालयीन परीक्षा उरकल्या असून काही परीक्षा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत संपणार आहेत. ज्यामुळं अनेकांचेच पाय गावाकडे किंवा पर्यटनस्थळांकडे वळणार यात शंका नाही. अशा परिस्थितीमध्ये किंवा कोणत्याही कारणानं कोकणाच्या मार्गानं जाणार असाल तर महत्त्वाचा रस्ता बंद असल्यानं पंचाईत होऊ शकते.
कोणता रस्ता बंद?
कराड ते चिपळूण या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 166 ई वर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही महत्त्वाची माहिती. पाटण शहरातील धांडे पुलाचं पुनर्बांधणी काम आणि बाजारपेठेतील काँक्रीट रस्त्याचं काम हाती घेण्यात आलं आहे. या कामामुळे पाटण शहरातून जाणारी वाहतूक पुढील साधारण 60 दिवसांसाठी पूर्णतः बंद करण्यात आली आहे. यादरम्यान पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन सातारा पोलीस अधिक्षक तुषार दोषी यांनी केलं आहे. वाहतूक मार्गाचा हा नियम 27 मार्च 2026 ते 27 मे 2026 दरम्यान लागू असेल.
कोणत्या पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन?
अवजड वाहनांची कराड/उंब्रजकडून चिपळूणकडे जाणारी वाहनं राष्ट्रीय महामार्ग 4 वरून पाचवड फाटा – उंडाळे – कोकरूड – मलकापूर – आंबा घाट – संगमेश्वरमार्गे चिपळूणला जातील.
चिपळूणकडून कराड/उंब्रजकडे येणारी वाहनं चिपळूण – संगमेश्वर – आंबा घाट – मलकापूर – कोकरूड – उंडाळे – पाचवड फाटा मार्गे राष्ट्रीय महामार्ग 4 वर येतील.
हलक्या वाहनांनी कोणत्या रस्त्यावरून जावं?
कराड/उंब्रजकडून चिपळूणकडे जाणारी वाहनं नवारस्ता – गव्हाणवाडी फाटा – नेरळे गोंड मार्गे कराड-चिपळूण महामार्गावर येऊन पुढे चिपळूणकडे जातील.
चिपळूणकडून कराड/उंब्रजकडे येणारी वाहनं नेरळे गोंड – गव्हाणवाडी फाटा – नवारस्ता मार्गे कराड, उंब्रजकडे जातील.
वाहतूकील वरील बदल लागू असताना दरम्यानच्या काळात पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात येणार असून, नागरिकांसह वाहनचालकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. महामार्गावरील वाहतूकीत करण्यात आलेल्या या बदलांचा नागरिकांच्या प्रवासासह वेळेवरही परिणाम होणार असल्यानं वेळ आणि प्रवासाचं नियोजन करुनच घराबाहेर पडणं आणि प्रवासाला निघणं सोईचं ठरेल.
