महाराष्ट्रामध्ये सध्या राजकीय वादळ उठवणारा भोंदू बाबा अशोक खरात चांगलाच चर्चेत आहे. महिलांवरील लैंगिक अत्याचार प्रकरणामध्ये खरातला अटक झाल्यापासून त्याच्याविरुद्ध एकूण 8 गुन्हे नाशिकमध्ये दाखल करण्यात आले आहेत. केवळ लैंगिक अत्याचारच नाही तर आर्थिक फसवणुकीचेही अनेक प्रकार समोर आल्याने अशोक खरात चांगलाच अडचणीत सापडला आहे. असं असतानाच आता अशोक खरातविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली जात आहे. त्यातच आता शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी खरात प्रकरणावर मोजून सात शब्दांमध्ये प्रतिक्रिया नोंदवली आहे.
भिडे नेमकं काय म्हणाले?
पुण्यामध्ये एका मंदिरात काही कार्यक्रमानिमित्त आलेल्या संभाजी भिडेंना पत्रकारांनी अशोक खरात प्रकरणावर प्रश्न विचारला. हा प्रश्न ऐकताच आधी भिडेंनी उत्तर देण्यास नकार दिला. पत्रकाराने पुढे केलेले माईक बाजूला सारत भिडेंनी, “ती काय बोलायच्या लायकीची माणसं आहेत का?” असा प्रतीप्रश्न केला. थोडं पुढे गेल्यानंतर मात्र भिडेंनी माईकसमोर घेत, “मारुन टाकून मोकळं व्हावं. चर्चासुद्धा करुन नये!” अशी प्रतिक्रिया नोंदवत मंदिरात निघून गेले.
खरातच्या संस्थेची आर्थिक नाकाबंदी
खरातच्या शिवानिका संस्थांनच्या आर्थिक नाड्या आवळण्यात आल्या आहेत. या संस्थेची सर्व बँक अकाउंट सील करण्याचे आदेश धर्मदाय आयुक्तांनी दिले आहेत. खाजगी आणि बेनामी मालमता माहिती नोंदणी विभागाकडून मागवण्यात आली आहे. संस्थांनच्या व्यवहारांचा तपास सुरू करण्यात आला आहे. विशेष तपास पथकाकडून मालमत्तेची माहिती मागण्यात आली असून कुटुंबीयांच्या नावावर असलेल्या जमीन, घर, दुकानांची चौकशी केली जाणार आहे.
नोंदणी विभागाकडून राज्यभरातील मालमत्तेचा शोध सुरू करण्यात आला आहे. कोट्यवधी रुपयांची आर्थिक माया उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मालमत्ता खरेदीसाठी पैसा कुठून आला, याचा तपास पोलीस करत आहेत. शिर्डी, सिन्नर, नाशिक परिसरात मोठ्या प्रमाणात खरात आणि त्याच्या कुटुंबियांच्या नावावर बेनामी मालमत्ता असण्याची शक्यता आहे. पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये तपासाला अधिक वेग मिळणार आहे.
ती काडतुसे खरातने कुठे वापरली?
अशोक खरातकडून जप्त बंदुकीचा परवाना नाशिक जिल्हा प्रशासनानेच दिल्याचे उघड झाले आहे. 15 ऑक्टोबर 2012 रोजी खरातला शस्त्र परवाना मंजूर झाला होता. 1 जानेवारी 2024 रोजी परवान्याचे नूतणीकरण झाल्याची नोंद सापडली आहे. छापेमारीदरम्यान खरातच्या फार्महाऊसवरून 21 काडतुसे जप्त करण्यात आली. त्यापैकी पाच काडतुसे वापरलेली असून हा वापर कशासाठी केला याचा तपास सुरू आहे.
राज्यभर गाजत असलेल्या घरात प्रकरणात दररोज नवे खुलासे होत आहेत. गेल्या सात दिवसांच्या तपासात खरातने शस्त्र बाळगल्याची माहिती समोर आली आहे. काडतुसांचा वापर नेमका कुठे झाला? याचा शोध तपास यंत्रणांनी सुरू केला आहे. शस्त्र परवान्यासाठी खरातने जिल्हा प्रशासनाकडे अर्ज केला होता. जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीनंतरच शस्त्र परवाना देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. खरातचा शस्र परवाना रद्द करण्याची प्रक्रिया आता सुरू करण्यात आली आहे.
