भरधाव कारची धडक; भीषण अपघातात सायकलिंग करणाऱ्या उद्योजकाचा मृत्यू, अल्पवयीन तरुणाचा आगाऊपणा बेतला जीवावर!

कल्याण परिसरात एका अल्पवयीन मुलाचा बेजबाबदारपणा रस्त्यावर सायकलिंग करणाऱ्या व्यवसायिकाच्या जीवावर बेतला आहे. या घटनेचा अंगावर काटा आणणारा थरारक व्हिडिओ समोर आला असून सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा अपघात कैद झाला आहे. कल्याण परिसरातील प्रसिद्ध उद्योजक श्रीनिवास तांदळे यांचा या भीषण अपघातात दुर्दैवीरीत्या मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलगा घरातील कारची चावी घेऊन तो कल्याण येथे असलेल्या रिंगरूट रस्त्याने निघाला होता. याचदरम्यान त्याचा कारवरील ताबा सुटला आणि रात्री आजच्या सुमारास या रस्त्यावरून सायकलिंग करत जाणारे उद्योजक श्रीनिवास तांदळे यांना या कारची जोरदार धडक बसली. यातच त्यांचा मृत्यू झाला. मंगळवारी रात्री 8 वाजताच्या सुमारास हा भीषण झाला. कल्याण पोलिसांनी संबंधित अल्पवयीन मुलाच्या आईवर याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

कल्याण येथील चांदोरी जवळून जाणारा रिंग रोड हा अलीकडे भरधाव कारचालकांमुळे अपघाताचा हॉटस्पॉट बनला आहे. या रिंग रोडवर सुरू असलेले मुजोर वाहन चालकांचे स्टंट आता थेट मॉर्निंग वॉक करणारे नागरिक व सायकलिंग करणाऱ्यांच्या जीवावरती बेतू लागले आहेत. या सगळ्या घटनेनंतर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. कल्याणमधील सायकलिंग करणाऱ्या ग्रुपमधील सायकलधारकांकडूनही या प्रकाराबद्दल संताप व्यक्त होत आहे.

हा भीषण अपघात झाला त्या रस्त्यावर याआधी पोलिसांकडून बॅरिकेड्स लावण्यात आले होते. मात्र काही दिवसांपूर्वी ते हटवण्यात आले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा अपघात घडू लागले आहेत, अशी माहिती सायकलिंग करणाऱ्या व्यक्तींकडून देण्यात आली आहे. या सगळ्या विरोधात सायकलिंग ग्रुपकडून आज गुरुवारी आंदोलन केलं जाण्याची शक्यता आहे. या अगोदर कल्याण पोलिसांनी गंभीर दखल घेत संबंधित कार चालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अपघाताप्रकरणी अधिक तपास कल्याण पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *