इराण आणि अमेरिका-इस्रायलमधील युद्धाचा थेट परिणाम भारतावर होताना दिसत आहे. एलपीजी सिलिंडरच्या दरात वाढ केल्यानंतर आता पेट्रोल-डिझेलच्या दरातही वाढ केली गेली आहे. होय, मध्यपूर्वेत युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतातील सर्वसामान्य नागरिकांना ज्याची भीती लागून होती तेच आता घडलं आहे.
भारतात पेट्रोल-डिझेलच्या किमतीत वाढ
भारतातील सर्वात मोठी खाजगी इंधन विक्रेता कंपनी नायरा एनर्जीने इंधनाच्या दरात वाढ जाहीर केली आहे. यासह भारतात पेट्रोलच्या दरात प्रति लिटर 5.30 रुपये आणि डिझेलचे दर प्रति लिटर 3 रुपयांनी वाढले आहेत.
त्याचवेळी, इराण-अमेरिका युद्धामुळे निर्माण झालेल्या ऊर्जा संकटाच्या पार्श्वभूमीवर होर्मुझची सामुद्रधुनी जवळजवळ ठप्प झाल्यामुळे आणि अमेरिका व इराणने ऊर्जा सुविधांवर केलेल्या हल्ल्यांमुळे जागतिक पुरवठा विस्कळीत झाल्याने गेल्या काही आठवड्यांपासून भारतातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये हळूहळू वाढ होत आहे.
याच पार्श्वभूमीवर इंधन तुटवड्याच्या चिंतेमुळे भारतातील अनेक राज्यांमधील लोक वाहनांमध्ये इंधन भरण्यासाठी पेट्रोल पंपांवर गर्दी करत असून एलपीजीच्या संकटामुळेही पेट्रोल पंप आणि डेपोंबाहेर लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत.
35 दिवसांसाठी नायरा एनर्जी बंद
याशिवाय मध्यपूर्वेतील तणावाचा सर्वाधिक फटका होर्मूझच्या समुद्रधुनीला झाला असून इराणने त्यातून जाणाऱ्या बहुतेक तेल आणि वायू जहाजांवर बंदी घातली ज्यामुळे भारतासह जगभरातील अनेक देशांना होणारा तेल आणि वायू पुरवठ्यात व्यत्यय आला. या पुरवठा तुटवड्यामुळे देशातील एक प्रमुख तेल कंपनी, नायरा एनर्जीला मोठा फटका बसला आणि कंपनीने 35 दिवस शटडाऊन म्हणजे बंद ठेवण्याची आदल्या दिवशी जाहीर केलेले.
रशियन दिग्गज रोसनेफ्टची पाठबळ असलेली नायरा एनर्जी, एप्रिलच्या सुरुवातीपासून सुमारे 35 दिवसांसाठी आपले कामकाज स्थगित करणार आहे, ज्यामुळे भारताच्या देशांतर्गत इंधन पुरवठ्यासमोर आणखी एक आव्हान उभं राहू शकतं. नायरा एनर्जीचे देशभरात मोठ्या संख्येने पेट्रोल पंप आहेत, ज्यामुळे या पंपांवर तेलाचा तुटवडा निर्माण होऊ शकतो.
