खरातचा सर्वात डेंजर घोटाळा! नागाची भीती दाखवून फॉरेन ट्रीप, फार्महाऊस, मर्सिडीज अन्…

भोंदू बाबा अशोक खरात विरोधात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिक पोलिसात खरात विरोधात दाखल झालेला हा आठवा गुन्हा असून हा गुन्हा खंडणी आणि फसवणुकीसंदर्भात आहे. राजेंद्र जासूद याने हा गुन्हा दाखल केला असून 2018 ते 2025 दरम्यान फिर्यादीला जीवे मारण्याची धमकी देत प्रचंड आर्थिक लूट केल्याचा आरोप करण्यात आला आहे. नरबळी व अंधश्रद्धा निर्मूलन कायदा अंतर्गत पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेत कारवाई सुरु केली आहे. विशेष म्हणजे खरातविरुद्ध तक्रार देणाऱ्या जासूदविरोधात खरातने स्वत: वावी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केलेली. आता हाच जासूद तक्रारदार झाला असून खरात आरोपी झाला आहे.

फार्महाऊसचा संपूर्ण खर्चही फिर्यादीकडून उकळला

जासूदने केलेल्या दाव्यानुसार, “21 देशांमध्ये घेऊन जा, तिथल्या मातीला स्पर्श करू दे — तरच भरभराट होईल” असं सांगून खरातने आपल्याला घाबरल्याचं सांगितलं. माझी मागणी न मानल्यास संपूर्ण कुटुंब संपेल अशी धमकी खरातने दिल्याचंही तक्रारीत म्हटलं आहे. फिर्यादीकडून आरोपी खरातने मर्सिडीज कार खरेदी करून घेतल्याचा आरोपही करण्यात आला आहे. परदेशात अनेक ठिकाणी हाय-फाय उपचारांचा खर्च फिर्यादीकडून उकळल्याचा दावा तक्रारीत करण्यात आलाय. “उत्तर पूजा आहे” असे सांगून फिर्यादीला ईशान्येश्वर मंदिरात नेल्याचा आरोपही करण्यात आला आहे. पूजेदरम्यान ‘ईशान्येश्वर महाराज आले’ असे सांगत मोठा नाग समोर आणल्याचा धक्कादायक आरोप जासूदने केला आहे. सर्व परदेश दौऱ्यांचा खर्च फिर्यादीकडून करून घेतल्याची तक्रार पोलिस स्टेशनमध्ये नोंदवण्यात आला आहे. फार्महाऊसचा संपूर्ण खर्चही फिर्यादीकडून उकळल्याचा दावा जासूदने केला आहे.

21 देशांमध्ये भ्रमण करावे लागेल

“अशोककुमार खरात उर्फ कॅप्टन खरात या भोंदू बाबाने त्यांच्याकडे दैवीशक्ती असल्याचे भासवून माझ्या मनात विश्वास र्निमाण केला. तसेच माझा लॉजिस्टिकचा व्यवसायाची चांगली सुरूवात होण्याकरीता तो व्यवसाय सुरू करण्यापूर्वी अवतार पूजा करण्यास सांगितली. ती पूजा करण्यापूर्वी मरणाची भीती दाखवून माझ्याकडून मर्सिडीज कार खरेदी करून घेतली. तसेच अवतार पूजा करत असताना हातचलाखी करून खोटा साप दाखविला. त्यानंतर परिसाची शक्ती प्राप्त करण्यासाठी 21 देशांमध्ये भ्रमण करावे लागेल व तसे न केल्यास नागदेवता तुला दंश करेल व तुझा मृत्यु होईल अशी भीती घालून विविध देशांमध्ये घेवून जावून त्या प्रवासाचा खर्च करून घेतला,” असं जासूदने तक्रारीत म्हटलंय.

काळी जादू करून मृत्यू घडवून आणेन

हा सारा प्रकार एवढ्यावरच थांबला नाही. पुढे, तक्रारीमध्ये जासूदने, “त्यानंतर गुरूच्या सेवेचे कारण सांगून व मृत्यूची भीती घालून अमेरिकेत घेवून जावून औषधोपचाराचा व प्रवासाचा खर्च वसूल केला. त्यानंतर उत्तर पूजेचं कारण सांगून ती पूजा न केल्यास मृत्यू होईल अशी भीती दाखवून ती पूजा करण्यापूर्वी फार्महाउसच्या बांधकामाचा खर्च करून घेतला. त्यानंतर उत्तर पूजा नवीन वास्तूमध्ये करण्याचे कारण सांगून मिरगाव येथील महादेवाचे मंदिराच्या मागे माझ्याभोवती रिंगण आखून मला मृत्यूची भीती दाखवून मला अन्यायाने कैद केले व माझेकडून फर्निचर खरेदीस पैसे ट्रान्सफर करण्यास भाग पाडले. तसेच मला त्यांच्या सांगण्याप्रमाणे कृत्य न केल्यास वेळोवेळी काळी जादू करून मृत्यू घडवून आणण्याची भीती निर्माण केली,” असं तक्रारदाराने म्हटलं आहे.

एकूण 4 ते 5 कोटी रूपयांची खंडणी

“अशोककुमार खरातने मला मृत्यू घडवून आणण्याची भीती दाखवून मर्सिडीज कार क्रमांक एमएच 15 जी.एल. 8181 ही जबरदस्ती स्वत:च्या नावावर करून घेतली. अशाप्रकारे माझी इच्छा नसताना अशोककुमार खरातने माझ्याकडून वेळोवेळी एकूण 4 ते 5 कोटी रूपयांची खंडणी वसूल केली. मी यातील बहुतांश रक्कम ही आरटीजीएसव्दारे व ऑनलाईन दिलेली आहे,” असंही तक्रारदाराने म्हटलं आहे.

बनाव उघड झाल्यानंतर फिर्यादीविरोधातच गुन्हा

“त्याचा सर्व हिशोब माझेकडे असून त्यासंबंधीचा कागदोपत्री पुरावा मी हजर करेन. तसेच अशोककुमार खरात हा बाबा फसवणूक करणारा व हातचलाखी करणारा, अघोरी कृत्ये करणारा असल्याचे समजल्यावर मी माझे पैसे परत मागितले. त्यावेळी अशोककुमार खरातने मला व माझ्या कुटुंबाला संपविण्याची धमकी देवून माझ्याविरूध्द खोटा गुन्हा दाखल केला,” असंही फिर्यादीने सांगितलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *