सकाळी दहाची वेळ, ११ वर्षांची विद्यार्थिनी सहा वर्षांच्या आपल्या भावासोबत शाळेतून घरी परतत होती. तेवढ्यात एका भटक्या श्वानाने सहा वर्षीय चिमुरड्यावर झडप घातली. अचानक झालेल्या या हल्ल्याने अजिबात न घाबरता विद्यार्थिनीने हल्लेखोर श्वानाशी झुंज देत भावाचे रक्षण केले. या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली आहे. अंबरनाथमधील या घटनेने भटक्या श्वानांच्या उपद्रवाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आह
नेमकं काय घडलं?
अंबरनाथ शहराच्या पश्चिमेकडील वांद्रापाडा येथे राहणारी वंशिका नांगर ही विद्यार्थिनी मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास आपल्या सहा वर्षांच्या भावासोबत घरी जात होती. अचानक एका भटक्या श्वानाने तिच्या भावावर हल्ला केला. आपल्या भावाला कोणतीही दुखापत होऊ नये यासाठी वंशिकाने त्या भटक्या श्वानाशी धीरोदात्तपणे झुंज दिली. वंशिकाच्या आक्रमक पवित्र्याने गांगरलेल्या श्वानाने तिच्यावर जोरदार हल्ला केला. वंशिका यात जबर जखमी झाली.
वंशिका आणि तिच्या भावाच्या आरडाओरड्याने सतर्क झालेल्या स्थानिक नागरिकांनी तत्काळ धाव घेत वंशिकाची सुटका केली. जखमी वंशिकाला नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. श्वानाशी लढताना वंशिकाने भावाला कोणतीही इजा होऊ दिली नाही. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.
