मेसमध्ये वॉटर फिल्टरचं बटण दाबताच शॉक, पुण्याच्या कृषी विद्यालयात MBA विद्यार्थ्याचा तडफडून मृत्यू

भोजनालयात विजेचा धक्का लागून एमबीएच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. पुण्यातील कृषी महाविद्यालय येथील ‘विद्यार्थी सहकारी भोजनालयात’ १४ मार्च २०२६ रोजी दुर्दैवी घटना घडली. मयत चैतन्य कुंडलिक चव्हाण हा कृषी व्यवसाय व्यवस्थापन (एबीएम) प्रथम वर्षाचा विद्यार्थी होता. या घटनेनंतर महाविद्यालयातील सुरक्षा व्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले असून विद्यार्थ्यांमध्ये भीती आणि संतापाचं वातावरण आहे.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, मेसमधील वॉटर फिल्टरचे बटण दाबल्यानंतर चैतन्यने नळाला हात लावताच त्याला विजेचा जोरदार धक्का बसला. काही विद्यार्थ्यांनी सांगितले की, उपकरणात विद्युत प्रवाह आल्याने ही दुर्घटना घडली असावी. या घटनेमुळे मेसमधील विद्युत सुरक्षिततेबाबत मोठा निष्काळजीपणा झाल्याचा आरोप केला जात आहे.

कोण होता चैतन्य चव्हाण ?

चैतन्य चव्हाण हा बीड जिल्ह्यातील आष्टी गावातील रहिवासी असून त्याची कौटुंबिक परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. गेल्या पाच वर्षांपासून तो पुण्यातील कृषी महाविद्यालयात शिक्षण घेत होता. त्याच्या अकाली मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

विद्यार्थ्यांमध्ये चिंता

घटनेनंतर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी एकत्र येत शांततापूर्ण आंदोलन सुरु केलं असून चैतन्यला न्याय मिळावा, तसंच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.

दरम्यान, शॉक लागल्याच्या घटनेनंतर चार दिवसांनी विद्यार्थी संघटना ‘एबीव्हीपी’नेही सहव्यवस्थापकांना निवेदन देत सखोल चौकशीची मागणी केली होती. सीसीटीव्ही फुटेज तपासून जबाबदारांवर कारवाई करावी आणि संबंधितांना निलंबित करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांचा कॉलेज आवारात ठिय्या

महाविद्यालय प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी सुरु असल्याचे सांगितले असून, आवश्यक ती कारवाई केली जाईल तसेच काही खर्चही उचलला जात असल्याचे स्पष्ट केलं होतं. मात्र, आता कॉलेजचे विद्यार्थ्यांनी दोषींवर कठोर कारवाई होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा दिला आहे. आज जवळपास २०० ते ३०० विद्यार्थी महाविद्यालयाच्या आवारात बसून आंदोलन करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *