येथील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले महिला व बाल रुग्णालयात प्रसूतीनंतर एका २१ वर्षीय महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्याने संताप व्यक्त करण्यात आला. साक्षी शंकर वनीस (रा. करंजाड, ता. बागलाण) असे मृत महिलेचे नाव असून, रविवारी (दि.२२) रात्री नऊ वाजता सिझेरियनद्वारे तिची प्रसूती करण्यात आली होती. प्रसूतीनंतर बाळ सुखरूप असल्याची माहिती आहे.
काय आहे प्रकरण?
मृत महिलेचे वडील विजय निंबा मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, साक्षीला दुपारी तीन वाजता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रात्री शस्त्रक्रियेद्वारे प्रसूती झाल्यानंतर तिला अतिरिक्त रक्तस्त्राव होत असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. सोमवारी (दि.२३) पहाटे तिची प्रकृती खालावली. कुटुंबीयांनी खासगी रुग्णालयात दाखल करण्याची तयारी दर्शविली होती, मात्र, रुग्णालय प्रशासनाने नकार देत तिला मालेगाव सामान्य रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉ. रोहित गुंजाळ यांनी तिला मृत घोषित केले. घटनेनंतर रुग्णालय परिसरात नातेवाइकांची गर्दी झाल्याने काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.
