पुण्यातील वाहतूक कोंडीवर दिलासा, तळेगाव-शिक्रापूर महामार्गाला मंजुरी; नवले पूल परिसरात उन्नत मार्गाचा प्रस्ताव

पुण्यातील नवले पूल परिसरात वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सुमारे सहा हजार कोटी रुपयांचा उन्नत मार्ग केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती राज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानसभेत दिली. दरम्यान, सुतारवाडी ते देहूरोड हा सुमारे १६ किलोमीटरचा उन्नत मार्ग प्रस्तावित असल्याचे कदम यांनी स्पष्ट केले. दरम्यान, तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्गालाही मंजुरी देण्यात आली आहे.

आमदार भीमराव तापकीर यांनी या संदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. या वेळी आमदार शंकर जगताप, आमदार बापू पठारे यांनी चर्चेत सहभाग घेतला. स्वामी नारायण मंदिर ते सनसिटी वारजे या दरम्यानच्या प्रस्तावित उन्नत मार्गाची सद्यस्थिती आणि त्यासाठी येणारा खर्च किती याची माहिती तापकीर यांनी विचारली होती. वाकड ते देहूरोड या दरम्यान उन्नत मार्ग तयार करण्यात येणार का, अशी विचारणा जगताप यांनी केली होती.

अपघातांवर नियंत्रण ठेवणं गरजेचं

यावर कदम म्हणाले, ‘संबंधित राष्ट्रीय महामार्गाचा सुमारे पाच ते सहा किलोमीटरचा भाग तांत्रिकदृष्ट्या संवेदनशील आहे. ग्रामीण भागातून शहराकडे येणाऱ्या जड वाहनांमुळे येथे वाहतूक कोंडी होते आणि त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत आहे. या पार्श्वभूमीवर हा उन्नत मार्ग प्रस्तावित आहे.’ तात्पुरत्या उपाययोजनांबाबत माहिती देताना कदम म्हणाले, ‘संबंधित ठिकाण ब्लॅक स्पॉट म्हणून घोषित करण्यात आले आहे. येथील सेवा रस्त्याची रुंदी सात मीटरवरून १०.५ मीटरपर्यंत वाढविण्यात आली आहे. वेगमर्यादा ६० किमीवरून ४० किमी प्रतितास करण्यात आली आहे.’

तळेगाव-शिक्रापूर महामार्गाला मंजुरी

पुणे जिल्ह्यातील वाढत्या वाहतूक कोंडीवर दिलासा देण्यासाठी तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाच्या उन्नतीकरणाला हिरवा कंदील मिळाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान भवनात पार पडलेल्या पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत या प्रकल्पाला मान्यता दिली. या बैठकीस उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मुख्य सचिव राजेश अग्रवाल; तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

तळेगाव ते चाकण (० ते २६ किमी) दरम्यान चार पदरी उन्नत, तसेच चार पदरी समांतर रस्ता; तसेच चाकण ते शिक्रापूर (२६ ते ४३ किमी) दरम्यान चार पदरी महामार्ग उभारण्यास मंजुरी देण्यात आली. हा प्रकल्प ‘डीएफबीओटी’ (डिझाइन, फायनान्स, बिल्ट, ऑपरेट अँड ट्रान्सफर) पद्धतीने राबविण्यात येणार आहे. सद्यस्थितीत ४३ किलोमीटर लांबीच्या मार्गाचा विकास करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *