अशोक खरातने 5 नरबळी घेतल्याचा संशय, सरकारी वकिलांचा कोर्टात युक्तिवाद

भोंदूबाबा अशोक खरात याच्या प्रकरणात आणखी धक्कादायक माहिती समोर येत आहे. अशोक खरात याला एसआयटीच्या पथकाने नाशिक न्यायालयात हजर केलं. यावेळी सरकारी वकिलांनी महत्त्वाचे मुद्दे आपल्या युक्तिवाद मांडले. अशोक खरात याने 5 नरबळी दिल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्याच्या पिस्तूलातून 5 गोळ्या मिसिंग आहेत. त्यामुळे त्याने 5 नरबळी घेतल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. तसेच सरकारी वकिलांनी कोर्टात आणखी काही महत्त्वाचे मुद्दे मांडत त्याच्या पोलीस कोठडीची मागणी केली. कोर्टाने सरकारी वकिलांचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर खरातच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकला. यानंतर कोर्टाने अशोक खरातला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. त्याला 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

“आरोपीच्या घराच्या झडतीत राजमुद्रा मिळाल्या आहेत. त्याने पिस्टलच्या माध्यमातून 5 नरबळी दिल्याचा संशय आहे, त्याचे पुरावे मिळाले आहेत. मालमत्ता कागदपत्रे मिळाले आहेत. अनेकांना त्याने फसविले आहे, त्याच्या तक्रारी पुढे आहेत. आरोपी 67 वर्षाचा आहे. तो 30 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करतांना व्हिडीओत दिसतो. त्याचे पिस्टल जप्त केले आहे. त्यात 5 जणांचा नरबळी दिल्याचा संशय आहे”, अशी माहिती सरकारी वकिलांनी युक्तिवादात दिली.

“अशोक खरातने खडे कुठून आणले, जे मिश्रित पाणी द्यायचा ते कुठून आणले, 21 जीवंत काडतुसे सापडले, तर 5 वापरलेले जिवंत काडतुसे सापडले आहेत. तो कस्तुरी वापरत होता. ते हरणाची शिकार करून आणली का? त्याचा तपास करायचा आहे. पीडित महिलांची संख्या वाढत आहे. त्यानुसार पोलीस कोठडी हवी आहे. राज्यात अघोरी कृत्याचा कायदा असताना आरोपी ते कृत्य करत होता”, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी कोर्टात केला.

“आरोपी अशोक खरातकडे प्राण्यांची कातडी, पांढरी कस्तुरी, काळी कस्तुरी आढळून आली होती. तसेच फॉर्म हाऊसमध्ये संपत्ती बाबतचे कागदपत्रे आढळून आले आहेत. त्याचबरोबर DVR देखील मिळून आला आहे. या DVR मध्ये काय होते का? हा DVR फॉर्म हाऊस येथे आणण्यात आला होता”, अशी माहिती सरकारी वकिलांनी कोर्टात दिली.

आरोपीच्या वकिलांनी काय युक्तिवाद केला?

“पोलिसांकडे 7 दिवस होते. ते आपला तपास पूर्ण का करु शकले नाहीत? जे घडत आहे त्याबाबत वाघाची कातडी, बंदूक आणि कस्तुरी बाबतचे प्रश्न मला विचारले नाही. अशोक खरात पूजा विधी करत होते. पण जादूटोना करत नव्हते”, असा युक्तिवाद आरोपीच्या वकिलांनी केला.

अत्याचार आणि फसवणुकीचे जाळे

तपासाधिकारी किरण सूर्यवंशी यांनी न्यायालयात सांगितले आहे की, पीडित महिलांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ६७ वर्षांचा आरोपी ३० वर्षांच्या मुलीवर अत्याचार करतानाचे पुरावे समोर आले आहेत. खरात याच्या घरात राजमुद्रा आणि अनेक मालमत्तेची कागदपत्रे सापडली आहेत. त्याने संमोहनाच्या जाळ्यात ओढून अनेकांना आर्थिकरित्या फसविले आहे. अघोरी कृत्ये प्रतिबंधक कायद्यानुसार त्याच्यावर कारवाई सुरू आहे. या गुन्ह्याची पाळमूळ शोधण्यासाठी पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काळात २९ मार्च पर्यंत सुनावण्यात आलेल्या पोलीस कोठडी दरम्यान पोलिस तपासत आणखी काय समोर येते? हे बघणे महत्त्वाचे असणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *