भटक्या कुत्र्याचं नख लागलं, इंजेक्शनच्या भीतीने उपचार टाळले, नऊ वर्षीय मुलीचा सहा महिन्यांनी रेबीजने मृत्यू

उनाड कुत्र्यांचा धोका सगळीकडेच वाढला आहे, यामुळे यापूर्वी काहींचे जीव गेले आहेत तर अनेकांना रेबीज सारख्या भयानक रोगाचे संसर्ग झाल्याचे प्रकार यापूर्वी घडले आहेत. मुंबईजवळच्या नालासोपाऱ्यात 9 वर्षीय मुलीला भटक्या कुत्र्याचे नख लागल्याने रेबीज रोगाची लागण झाली, यातच तिचा दुर्दैवाने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. कशिश सहानी असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. नालासोपारा पश्चिम परिसरात ही घटना घडली आहे.

नेमकं काय घडलं होतं?

कशिश सहानी ही मुलगी नालासोपारा परिसरातील ‘मदर मेरी’ या शाळेत इयत्ता चौथीमध्ये शिकत होती. नालासोपारा पश्चिमेतील सुबोध सागर इमारतीत आपल्या आई-वडील कुटुंबासमवेत ती राहत होती. सहा महिन्यांपूर्वी ती आपल्या आजोबांबरोबर जात असताना तिला भटक्या कुत्र्याने नख मारले होते. तिला दुसऱ्या दिवशी उपचारासाठी नेण्यात आलं होत. मात्र इंजेक्शनच्या भीतीने ती घाबरल्याने तिला उपचार न करता घरी आणण्यात आलं होतं.

त्यानंतर काही दिवसांनी ही जखम भरल्याने हा प्रकार फारसा कोणाच्या लक्षात आला नाही. मात्र चार-पाच दिवसांपूर्वी तिची प्रकृती बिघडली तिने अन्न पाणीच बंद केल. तसेच तिचे डोळे लाल झाल्याची लक्षणे दिसली. कुटुंबीयांकडून तिला तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचार करतात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांच्या सल्ल्याने तिला पुढे मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात तातडीने हलवण्यात आलं. मात्र याच दरम्यान तिचा उपचारादरम्यान सोमवारी मृत्यू झाला

मृत्यू अहवालात रेबीजच्या संसर्गामुळे या मुलीचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आल्याची माहिती सुबोध सोसायटीच्या सचिव श्रुती शेनॉय यांनी दिली. या सगळ्या धक्कादायक प्रकारामुळे खळबळ उडाली असून भटक्या कुत्र्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

नालासोपारा महानगरपालिका क्षेत्रातील तातडीने भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी आता सर्व स्तरातून होऊ लागली आहे. भटक्या कुत्र्याच्या चावल्याने अथवा नख मारल्याने एका लहान मुलीचा जीव गेला आहे या घटनेने परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. महानगरपालिका क्षेत्रात भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *