उन्हाळ्यात मुंबईकरांचा घसा कोरडा! युद्धाचा फटका बाटलीबंद पाण्याला; अनेक कारखाने बंद, 12 बाटल्यांमागे 25 रुपये वाढले

आखाती युद्धामुळे विविध प्रकारचा कच्चा माल महागला असून त्याचा पुरवठाही अनियमित होत आहे. त्याची झळ बाटलीबंद पाण्यालाही बसली आहे. पाण्याची प्लास्टिकची बाटली तयार करण्यासाठी आवश्यक प्रीफॉर्मची किंमत ५० टक्क्यांहून अधिक वाढल्यामुळे राज्यातील २० टक्के बाटलीबंद पाणी तयार करणारे प्लाण्ट बंद झाले असून १२ पाण्यांच्या बाटल्यांच्या एका बॉक्सच्या किंमतीत २५ रुपयांची वाढ झाली आहे.

20 टक्के कारखाने झाले बंद

प्लास्टिकची पाण्याची बाटली तयार करण्यासाठी आवश्यक प्रीफॉर्मची किंमत ५० टक्क्यांहून अधिक वाढली आहे. १८ पैशांना मिळणाऱ्या बाटलीचे झाकण ४० पैशांना मिळते आहे. बाटल्यांच्या पॅकिंगसाठी पूर्वी बॉक्स यायचे. आता जाड प्लास्टिकमध्ये १२ बाटल्या दिल्या जातात. यामुळे बाटलीबंद पाण्याचा व्यवसाय करण्यात अडचणी येत आहेत. ‘राज्यात ९०० बाटलीबंद पाणीनिर्मितीचे कारखाने आहेत. वाढलेल्या किमती आणि महागाईमुळे लहान-मोठे जवळपास २० टक्के कारखाने बंद झाले आहेत. अडचणीच्या काळात व्यवसाय सुरू ठेवणाऱ्यांना कच्च्या मालाचा पुरवठा सातत्याने होत नाही. या परिस्थितीमुळे प्रति बॉक्समध्ये २५ रुपयांची वाढ करावी लागली आहे,’ असे महाराष्ट्र बॉटल वॉटर मॅन्युफॅक्चरर असोसिएशनचे अध्यक्ष विजय सिंह दुब्बल यांनी सांगितले.

ऐन उन्हाळ्यात निर्माण झालेल्या स्थितीमुळे राज्य सरकारने याला अत्यावश्यक दर्जा देऊन बाटलीबंद पाणी व्यावसायिकांना कच्च्या मालाचा पुरवठा सुरळीत करावा. कच्च्या मालाच्या वाढत्या मागणीवर नियंत्रण ठेवावे, कारखान्यांना गॅससह कच्च्या मालाचा पुरवठा अविरत करावा, अशी मागणी असोसिएशनने केली आहे.

पाण्याच्या मागणीत ३० ते ३५ टक्के वाढ

उन्हाळ्यातही शहरातील मोफत पाणपोईवर पाणी उपलब्ध नाही. रेल्वे-एसटी स्थानकांवरील पाणपोईमध्ये पाणी असले तरी अस्वच्छतेमुळे तिथे पाणी पिण्यास सर्वसामान्य धजावत नाहीत. त्यामुळे तहान भागवण्यासाठी बाटलीबंद पाण्याला सर्वांची पसंती आहे. यामुळे बाटलीबंद पाण्याच्या मागणीत ३० ते ३५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

कॉलेज कॅण्टीनच्या मेन्यूला कात्री

लेक्चर बंक केल्यानंतर ते मित्रामित्रांमधील राडा सोडवण्यासाठी ‘मांडवली’ करण्यापर्यंत विविध कारणांसाठी महाविद्यालयीन तरुणांची हक्काची जागा असलेली कॉलेज कॅण्टीन सध्या ओस पडू लागली आहेत. दूर आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे देशभरात निर्माण झालेल्या गॅसटंचाईचा फटका या महाविद्यालयीन उपाहारगृहांना बसला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *