‘अशोक खरातला भेटले त्यांची HIV चाचणी करा, अन्यथा…’; विजय वडेट्टीवारांनी व्यक्त केली मोठी भीती

कॅप्टन अशोक खरात प्रकरणाचे पडसाद आता अधिवेशनातही उमटले आहेत. अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्याला सोमवारपासून सुरुवात होताच विरोधकांनी याप्रकरणी आक्रमक भूमिका घेत आणखी कडक कारवाईची मागणी केली आहे. यादरम्यान काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी जे अशोक खरातला भेटले त्यांची एचआयव्ही चाचणी करावी लागेल अशी मागणी केली आहे. अन्यथा सगळे मरतील अशी भीतीही त्यांनी बोलून दाखवली आहे.

जे भेटले आहेत, जे व्हिडीओ क्लिपमध्ये आले आहेत त्यांच्या मोबाईलचे सीडीआर तपासले पाहिजेत. जे या भोंदू बाबाला भेटले आहेत त्यांची एचआयव्ही चाचणीही करावी लागेल. सरकारनेच ही चाचणी करावी अन्यथा संसर्गजन्य रोग होईल आणि सगळेच मरतील,” असं विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत.

 

‘सर्वांचे सीडीआर तपासले पाहिजेत’

“पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो आणि हे प्रकार आहेत. या प्रकरणात अनेक अधिकारी आहेत. महसूल विभागाचे अधिकारीदेखील आहेत. सर्वांचे सीडीआर तपासले पाहिजेत. जेल घेण्यासाठी जात होते. संपुर्ण देशात महाराष्ट्रीची बदनामी झाली आहे. ज्या दिवशी ही कारवाई झाली ती होऊ नये यासाठी तीन आयपीएस अधिकारी हॉटेलमध्ये बसुन होते,” असा दावाही त्यांनी केला.

‘बाहेरुन किर्तन आतून तमाशा’

“महिला आयोगाच्या अध्यक्षा या संवैधानिक पदावर बसलेल्या असताना पाय धुतात. बरेच मंत्री ही जाऊन बसले होते. महिलांच शोषण झाल्याच ही समोर येत आहे. एक किर्तनकार 16 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करतो.  बाहेरुन किर्तन आतून तमाशा,” असा संतापही त्यांनी बोलून दाखवला. यावर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी,  यासंदर्भात शासन कारवाई करत आहे. शासनाने गंभीर दखल घ्यावी असं म्हटलं.

‘हे खपवून घेतले जाणार नाही’

“पुरोगामी महाराष्ट्रात धर्माच्या नावाखाली महिलांचे शोषण करणाऱ्या अशोक खरातसारख्या भोंदू बाबांना अभय मिळणे, ही अत्यंत शरमेची बाब आहे. ज्योतिषशास्त्राच्या नावाखाली लोकांची दिशाभूल करणाऱ्या या भोंदूचे 100 हून अधिक आक्षेपार्ह व्हिडिओ समोर आले आहेत. या विकृत प्रवृत्तीमुळे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि सामाजिक परंपरेला तडा जात असून, हे खपवून घेतले जाणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला आहे.

‘दोषी अधिकाऱ्यांचे निलंबन झालेच पाहिजे’

“सर्वात धक्कादायक म्हणजे या भोंदू बाबाला अटक होऊ नये म्हणून शासनाचे उच्चपदस्थ IAS, IPS आणि महसूल अधिकारी एका हॉटेलमध्ये बैठका घेत होते. जे अधिकारी आणि मंत्री संविधानाची शपथ घेतात, तेच जर अशा भोंदूंच्या पाया पडत असतील, तर सामान्य जनतेने न्याय कोणाकडे मागायचा? केवळ SIT नेमून हे प्रकरण शांत होणार नाही, यात सामील असलेल्या प्रत्येक मंत्र्याचा राजीनामा आणि दोषी अधिकाऱ्यांचे निलंबन झालेच पाहिजे,” अशी मागणीही त्यांनी केली आहे.

दुसरीकडे काँग्रेस नेते नाना पटोले यांनी यावर चर्चा झाली पाहिजे, अन्यथा महाराष्ट्र माफ करमार नाही असं म्हटलं आहे. “या भोंदूबाबामुळे महाराष्ट्राची बदनामी झाली आहे. यावर चर्चा झाली पाहिजे. नाही तर महाराष्ट्र माफ करणार नाही . चाकणकर यांचा राजीनामा झाला मात्र ज्यांचे फोटो आहेत त्यांचे राजीनामे झाले का?,” असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *