जालन्यात क्षुल्लक कारणावरुन दोन गटात वाद झाल्याची घटना काल रविवारी रोजी सायंकाळी 7 वाजता घडली. या वादाचं रूपांतर हाणामारीत होऊन तीनजण जखमी झाले आहेत. या सर्व जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असताना एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. जालना शहरातील मोतीबाग परिसरात ही मारहाणीची घटना घडलीय.
नेमकी घटना काय?
दोन गटात रेड्यांची टक्कर लावण्यावरून काही वाद झाला होता. या वादाचं रूपांतर नंतर शिवीगाळ आणि हाणामारीत झालं. या मारहाणीत एका गटातील तिघेजण जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर गंभीर जखमी असलेला रवी अशोक लाड (वय २८) याची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्याला पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. त्याच्यावर त्याठिकाणी डॉक्टरांनी शर्तीचे प्रयत्न करत उपचार करायला सुरुवात केली. मात्र, काल रात्री एक वाजेच्या सुमारास त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
१५ दिवसांपूर्वीच लग्न
मारहाणीमध्ये रवीच्या पोटात धारदार शास्त्राने वार करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून तसेच डोक्याला सुद्धा जबर मार लागला होता. हृदयद्रावक बाब म्हणजे, रवी लाड या तरुणाचं १५ दिवसांपूर्वीच लग्न झालं होतं. संसार फुलण्याआधीच पतीचा मृत्यू झाल्यानं पत्नीसह आई-वडिलांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, यामध्ये प्रेम लाड (वय २०) आणि नरेश अवघड (वय २०) हे सुद्धा जखमी आहेत. या झालेल्या घटनेमुळे जालना शहरासह परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सदर प्रकरणात पोलीस ठाण्यात नोंद घेण्यात आली असून मारहाण करणाऱ्यांचा शोध सध्या पोलीस घेत आहे.
कर्ता लेक गेल्यानं कुटुंबासह गावात हळहळ
जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील वडोदा तांगडा येथे एका 35 वर्षीय युवकाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी घडली. गणेश एकनाथ तांगडे असं आत्महत्या केलेल्या युवकाचं नाव आहे. त्याच्या जाण्याने संपूर्ण कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळलेला आहे.
