येऊरमधून 6 वर्षांपूर्वी रेस्क्यू केलेल्या ‘बिट्टू बॉस’ बिबट्याचे निधन, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात घेतला अखेरचा श्वास

येऊरमध्ये सहा वर्षांपूर्वी आईपासून ताटातूट झाल्यानंतर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात वास्तव्याला असणाऱ्या ‘बिट्टू बॉस’ या बिबट्याचा शनिवारी मृत्यू झाला. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या बछड्याला दत्तक योजनेंतर्गत दत्तक घेतले होते. मूत्रपिंडाच्या आजारामुळे बिट्टू गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून आजारी होता. अखेर शनिवारी त्याने अखेरचा श्वास घेतला. त्याच्या दुर्देवी मृत्यूने सरनाईक कुटुंबियांसह संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे कर्मचारी आणि वन्यजीवप्रेमींनी हळहळ व्यक्त केली आहे.

येऊरच्या एअरफोर्स स्टेशनसमोर असलेल्या ओपन जिम शेजारी ३ डिसेंबर २०१९ रोजी मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या नागरिकांना या बछड्याचे दर्शन झाले होते. वनविभागाच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले. पुन्हा आईच्या कुशीत पाठवण्यासाठी रात्री त्याच ठिकाणी सोडून ट्रॅपकॅमेऱ्याची नजर ठेवली होती. मात्र मध्यरात्री त्याच्याजवळ आलेल्या आईने रेकी केली. पिल्लाच्या जवळही गेली. मात्र त्याला कुशीत न घेता ती जंगलामध्ये निघून गेली होती. त्यावेळी तब्बल आठ दिवस अशा पद्धतीने बछड्याच्या आईची शो धमोहीम सुरु होती. मात्र त्यात यश न आल्याने शोध मोहीम वनविभागाने आटोपती घेतली होती.

यानंतर त्याला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या गेस्ट हाऊसमध्ये काही काळ ठेवले. त्याच्या प्रकृतीवर येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची टीम आणि वन विभागाचे कर्मचारी लक्ष ठेवून होते. त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली होती. मात्र त्याचे अवघे १२ दिवसांचे वयोमान असताना आईपासून ताटातूट झाल्याने त्याला पुन्हा जंगलात न सोडता याठिकाणीच ‘लेपर्ड सफारी’ उभारून ठेवण्याचा निर्णय घेतला. त्या सफारीमध्येच त्याचे वास्तव्य होते.

दत्तक प्रक्रियेनंतर मिळाली नवी ओळख

मंत्री सरनाईक यांनी रीतसर प्रक्रियेप्रमाणे या बछड्याला दत्तक घेतले. त्यांचे चिरंजीव, युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या २८ डिसेंबर रोजी असणाऱ्या वाढदिवसाचे औचित्य साधून दत्तक प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. पूर्वेश यांना कुटुंबिय ‘बिट्टू’ या टोपण नावाने संबोधतात. या नावावरूनच या बछड्याचे ‘बिट्टू बॉस’ नामकरण केले होते. या बछड्याच्या निधनानंतर ‘आमच्या बिट्टू बॉसने जगाचा निरोप घेतला. ही आमच्या सर्वांसाठी अतिशय दुःखद बाब आहे. या छोट्याशा जीवाने आम्हाला सर्वांनाच लळा लावला. त्याच्या सर्व आठवणी डोळ्यासमोर उभ्या राहत आहेत. त्याचा जिव्हाळा व निरागसता सदैव स्मरणात राहील, अशा शब्दांत मंत्री सरनाईक यांनी याबाबत दुःख व्यक्त केले.

साडेतीन महिन्यांपूर्वी अखेरची भेट

९ डिसेंबर २०२५ रोजी मी ‘बिट्टू’ची प्रत्यक्ष भेट घेतली होती. त्यानंतर नेहमी व्हिडीओ कॉलद्वारे मी त्याच्यासह डॉक्टरांच्या टीमशी संपर्कातही होतो. त्याच्या आजाराचे निदान झाल्यानंतर विविध तपासण्या सुरु होत्या. मात्र उपचारांना यश आले नाही. ‘तो फक्त एक प्राणी नव्हता, तर कुटुंबाचा भाग होता. त्याच्या आठवणी, त्याची निरागसता आणि आपुलकी सदैव मनात जिवंत राहतील’, अशी भावना पूर्वेश सरनाईक यांनी या दुःखद प्रसंगानंतर व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *