‘ज्यांनी मंत्रिमंडळाची बैठक घेऊन भोंदूबाबा अशोक खरातच्या संस्थेला ४० किलोमीटर अंतरावरून पाणी दिले, त्यांना काय शिक्षा द्यायची’, असा सवाल करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी येथे विरोधकांना लक्ष्य केले. आपल्यावरील टिकेला उत्तर देत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर पलटवार केला.
फडणवीस रविवारी नागपुरात माध्यमांशी बोलत होते. ‘खरातसोबतचे विरोधकांकडील अनेकांचे फोटो माझ्याकडे आहेत’, असे मुख्यमंत्री म्हणाले. खरातचे प्रकरण पुढे आल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महायुती सरकारवर हल्ला चढवत खरातसोबत फोटो असलेल्या मंत्र्यांनी जबाबदारी स्वीकारून राजीनामे द्यावेत, अशी मागणी केली आहे. ‘या प्रकरणाला राजकीय रंग देण्याचा कुणी प्रयत्न करू नये. विरोधी पक्षातील कोण कोण खरातला भेटले, तेही माझ्याकडे आहे.
खरात प्रकरण गंभीर आहे. एसआयटीद्वारे सर्वप्रथम या प्रकरणाचा आम्हीच भंडाफोड केला. लाजेखातर महिला पुढे येत नाहीत. मात्र, त्या महिलांना आम्ही धीर देत असून पुढे आणण्याचा प्रयत्न करीत आहोत. काही महिला प्रतिसादही देत आहेत. नाशिक पोलिस व एसआयटी योग्य तपास करीत आहे. या प्रकरणात कुणालाही सोडणार नाही’, असे मुख्यमंत्री म्हणाले.
रूपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यावर ते म्हणाले, ‘चाकणकर या खरात यांना गुरू मानत होत्या. त्यामुळे चौकशीत अडथळा येण्याची शक्यता होती. म्हणून त्यांचा राजीनामा घेतला. ही बाब त्यांनीही मान्य केली अन् राजीनामा दिला. या प्रकरणात सनदी अधिकाऱ्यांचा सहभाग आहे का, ते तपासू. खरात प्रकरणात जिथे आर्थिक व्यवहार झाले असेल तिथे चौकशी करण्यात येईल.’
मोर्चा कशासाठी, हेच त्यांना माहिती नाही !
एपस्टीन फाइल्सवरून प्रदेश काँग्रेसच्यावतीने आज, सोमवारी नागपुरात मोर्चा काढण्यात येणार आहे. याबद्दल विचारले असता मुख्यमंत्री म्हणाले, ‘लोकशाहीत कुणालाही कुणाविरोधात मोर्चा काढण्याचा अधिकार आहे. परंतु, ते कशासाठी मोर्चा काढत आहेत, हे त्यांनाच माहीत नाही. त्यांच्याकडे कुठलेही पुरावे नाहीत. कुठलीही कल्पना त्यांना नाही. फक्त माध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांच्या आधारे ते मागणी करीत असून माध्यमांमध्ये चर्चेत राहण्यासाठी हा खटाटोप आहे.’
ममता बॅनर्जी, राहुल गांधींवर टीका
बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘घुसखोर’ म्हटले. याबाबत विचारले असता, ‘ममता बॅनर्जी बंगालमध्ये पराभूत होत असल्याने त्यांनी विवेक सोडला’, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली. युद्धाच्या पार्श्वभूमीवर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देशात महागाईचे संकेत देत टीका केली होती. यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, ‘बांगलादेश, श्रीलंका, पाकिस्तानमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. आपल्या देशात चांगली स्थिती आहे. मात्र, राहुल गांधी देशाला बदनाम करीत आहेत.’
