मुंबईतील सागरी किनारा मार्गाच्या उत्तरेकडील भागात उत्तन-विरार सी लिंक प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. यासाठी राज्य सरकाने सविस्तर प्रकल्प अहवाला मंजुरी दिली असून पर्यावरणा संबंधित सर्व परवानग्याही देण्यात आल्या आहेत. यासाठी टेंडर मे 2026पासून मागवायला सुरुवात करणार आहेत. मुंबईतील अटल सेतूपेक्षाही लांब असा हा प्रस्तावित मार्ग असेल.
कसा असेल मार्ग?
उत्तन-विरार सी लिंक प्रकल्प 55.12 किमी लांब असेल. या मार्गामुळे दक्षिण मुंबईतील नरिमन पॉईंट ते विरार आणि पुढे पालघरपर्यंत प्रवास सोपा आणि वेगवान होणार आहे. उत्तर आणि दक्षिण किनारपट्टीला जोडणारा हा आठ पदरी मार्ग असेल. सध्या 90 मिनिटांचा प्रवास या मार्गामुळे 30 ते 40 मिनिटांवर येणार आहे. या मार्गावर एक मुख्य सागरी पूल, अप्रोच मार्ग, आणि अनेक इंटरचेंजेसचा समावेश आहे. परंतु या सी लिंक प्रकल्पासाठी तब्बल 100 हेक्टर खारफुटी बाधित होणार आहेत.
पहिला टप्पा कुठे?
या प्रकल्पाचं काम सध्या दोन टप्प्यात पूर्ण होणार आहे. पहिल्या टप्प्यात उत्तन ते विरारदरम्यान 24.35 लांब सागरी पुलाने भाईंदरजवळ जोडणार आहे. यामध्ये सी लिंक आणि अप्रोच मार्ग अशा दोन महत्त्वपूर्ण मार्गांचा समावेश आहे. यामध्ये उत्तनला जोडणारा 9.32 किमी लांब मार्ग, वसईला जोडणारा 2.5 किमी लांब मार्ग आणि विरारपर्यंत 18.95 किमी लांब मार्गाचा समावेश आहे. या प्रकल्पासाठी सध्या 58,754 कोटींचा खर्च अपेक्षित आहे
दरम्यान, प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात या मार्गाला पुढे पालघरपर्यंत जोडण्यात येणार आहे. या मार्गामुळे पश्चिम द्रुतगती मार्ग, एसव्ही रोड आणि लिंक रोडवरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच, उत्तन- भाईंदर, वसई-विरारला थेट मुंबईशी जोडणी मिळणार आहे. दुसरा टप्पा पूर्ण होताच नवीन तयार होणाऱ्या वाढवण बंदरालाही थेट जोडणी मिळणार आहे.
मुंबईत सध्या बऱ्याच महत्वाकांक्षी प्रकल्पांचं काम सुरू आहे. त्यांचाच एक भाग उत्तन-विरार सी लिंक देखील आहे. यामध्ये मुंबईतील सागरी किनारा मार्ग, वांद्रे-वरळी सी लिंक, अटल सेतू, ऑरेंज गेट टनल, वर्सोवा-वांद्रे सी लिंक, उत्तर सागरी किनारा मार्ग, दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्ग आणि शिवडी-वरळी कनेक्टरचा समावेश आहे.
