गोरेगावमधील गोकुळधाम परिसरात इमारतीला भीषण आग, महिलेचा होरपळून मृत्यू; बिल्डिंगमध्ये धुराचे लोट

मुंबईच्या गोरेगाव भागात असणाऱ्या गोकुळधाम परिसरात लक्ष चंडी बिल्डिंगमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. काल संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास बिल्डिंगच्या सातव्या मजल्यावर एका घरात ही मोठी आग लागली होती. या आगीमध्ये एका महिलेचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. शॉर्ट सर्किटमुळे घरामध्ये आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पाच ते सहा गाड्यांचं पाचारण करण्यात आलं. तब्बल एका तासानंतर आग आटोक्यात आणण्यात अग्निशामक दलाला यश मिळालं. अचानक बिल्डिंगमध्ये आग लागल्यावर धूर पसरल्यामुळे मोठ्या संख्येमध्ये तिथे राहणारे लोक अडकले होते. अग्निशामक दलाच्या जवानांनी सर्व अडकलेल्या लोकांना सुखरुप बाहेर काढलं. या आगीमध्ये संपूर्ण घर जळून खाक झालं आहे, तर एक महिलेचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आग कशामुळे लागली यासंदर्भात अधिक तपास स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आगीमध्ये मृत्यू झालेल्या महिलेचं नाव इंदू तारकेश्वर सिंग (वय ७२) असं होतं.

मुंबईमध्ये हत्या प्रकरणांची मालिका

मुंबईमध्ये हत्यांचं सत्र थांबताना दिसत नाहीय. कुर्ला येथे रिक्षात आसनावरून झालेल्या वादातून तरुणाची झालेली हत्या आणि मालवणीत तरुणाने पत्नीला ठार केल्याच्या घटना ताज्या असतानाच अशा आणखी तीन घटना समोर आल्या आहेत. अंधेरीच्या डी. एन. नगर परिसरात १७ वर्षांच्या दोन मुलांनी एका १५ वर्षाच्या मुलाची गळा आवळून हत्या केली. वडाळा येथे दारूसाठी पैसे देत नसल्याने झालेल्या वादातून पतीने पत्नीला अमानुष मारहाण केली. यामध्ये तिचा मृत्यू झाला. तर, अँटॉप हिल परिसरात सेक्टर सातमध्ये एका २४ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हॉटेलमध्ये काम करणारी तीन अल्पवयीन मुले डी. एन. नगर परिसरात भाड्याने खोली घेऊन राहत होते. १५ वर्षांच्या मुलाचे इतर दोघांसोबत वारंवार खटके उडायचे. तो आपल्याबाबत मालकाचे कान भरत असल्याचा दोघांना संशय होता. पैशावरून त्याच्यासोबत भांडण व्हायचे. दोन दिवसांपूर्वी त्याच्यासोबत याच कारणावरून वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की दोघांनी या मित्राची गळा दाबून हत्या केली. कुणाला कळू नये म्हणून दोन दिवस खोलीतच मृतदेह ठेवला. अखेर शनिवारी त्यांनी, या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा बनाव रचला. मात्र पोलिसांच्या तपासात हा बनाव उघड झाल्यानंतर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *