कोल्हापुरच्या जोतिबा मंदिरामध्ये पुजाऱ्यांकडून भाविकांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण झाल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या पुजाऱ्यांवर कारवाईची मागणी केली जात असतानाच आता मंदिर प्रशासनाने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन या भाविकांना मंदिराच्या आवारातच मारहाण का करण्यात आली याचं कारण सांगितलं आहे. मंदिर प्रशासनाने पुजारी एवढे का संतापले आणि या भाविकांना का मारहाण झाली यामागील कारण सांगितलं आहे.
बदनामी करण्याचा कट
व्हायरल झालेला व्हिडीओ हा, ‘पुजारी समाजाची बदनामी करण्याचा कट’ असल्याचं श्री क्षेत्र जोतिबा मंदीर ऑफिसियल पेज वरुन म्हटलं आहे. तसेच ज्या भाविकांना मारहाण झाली ते दारु पिऊन आले होते असा दावाही या पोस्टमध्ये करण्यात आला आहे. ‘श्री क्षेत्र जोतिबा डोंगरच्या व्हिडिओची सत्य परिस्थिती, दारू पिलेल्या भाविकाची चूक न बघता पुजारी समाजाची बदनामी करण्याचा कट,’ या मथळ्याखाली पोस्ट लिहिण्यात आली आहे.
व्हिडिओत आहे काय?
व्हायरल झालेला व्हिडीओ दर्शनाच्या रांगेमध्ये वरुन जाण्यासाठी जी सोय करण्यात आली आहे त्या लोखंडी पायऱ्यांवरुन काढण्यात आल्याचं लक्षात येत आहे. व्हिडीओमध्ये दोन भाविकांच्या अंगावर पुजाऱ्यांचे दोन गट अक्षरशः तुटून पडल्याचं दिसत आहे. यापैकी दोन्ही भाविक अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे अगदी जमिनीवर पडले. तर जमिनीवर पडलेल्या या भाविकाच्या पोटावर आणि अंगावर लाथा मारताना दिसत आहेत. दोन्ही भाविकांना भिंतीजवळ अडवून ही मारहाण केली जात आहे. अगदी आवेशाने पुजारी या भाविकांना मारहाण करताना दिसत आहेत. दोन ते तीन पुजाऱ्यांकडून भाविकांच्या डोक्यात नारळ सुद्धा मारल्याचे व्हिडिओतून समोर आलं आहे. या पुजाऱ्यांना अखेर इतर भाविकांनी थांबवलं. मात्र सुरुवातीला या भाविकांनी पुजाऱ्यांना हल्ल्यापासून परावृत्त करण्यासाठी प्रयत्न केला असता त्यांनाही काही प्रमाणात या पुजाऱ्यांनी धक्काबुक्की केल्याचं दिसून आलं आहे.
