उपनगरी रेल्वेच्या विस्तारीकरणावर भर असतानाच रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेकडे मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून सातत्याने दुर्लक्ष होत आहे. मुंबई लोकलवर रविवारी, १५ मार्चला एकाच दिवशी १४ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची नोंद मुंबई रेल्वे पोलिसांकडे झाली आहे. यामुळे रुळांवरील मृत्यू रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रशासनाच्या उपाययोजनांवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
कुंपण उभारण्याची गरज
रेल्वेरुळांच्या बाजूने मजबूत कुंपण उभारून रेल्वेरुळ ओलांडणी पूर्णपणे रोखणे आवश्यक आहे. यासोबतच रुळ ओलांडणाऱ्यांवर कडक कारवाई करावी. प्रवाशांमध्ये विविध उपक्रमांद्वारे जनजागृती करण्याची गरज प्रवाशांकडून सातत्याने व्यक्त होत आहे.
एमआरव्हीसीने एमयूटीपी तीन प्रकल्पांतर्गत मध्य आणि पश्चिम रेल्वे स्थानकांदरम्यान होणाऱ्या रेल्वेरुळ ओलांडण्याच्या ठिकाणी उपाययोजना राबवण्यासाठी ५५१ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली होती. प्रकल्पांतर्गत ३६ ठिकाणी रुळ ओलांडणे टाळण्यासाठी पूल उभारणी, कुंपण घालणे, भिंत उभारणे असे उपाय राबवण्यात आले. मात्र त्यानंतरही रुळांवरील मृत्यू वाढतच आहेत.
पादचारी पुलाचा वापर करा
कितीही घाई असली, तरी रुळ ओलांडण्याचा मोह टाळावा. रुळाजवळ वावरताना मोबाइलचा वापर किंवा हेडफोन लावणे टाळावे. लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांची काळजी घ्यावी, त्यांना एकटे सोडू नये, अशा उपायांतून रेल्वेरुळांवरील अपघात कमी करण्यास प्रवाशांनीदेखील पुढाकार घेणे गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया कल्याण-कसारा-कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष राजेश घनघाव यांनी दिली.
सन २०२५मध्ये रुळ ओलांडणी आणि धावत्या रेल्वेतून पडून झालेले मृत्यू
पोलिस ठाणे -प्रवासीसंख्या
पालघर –८४
टर्मिनस लोकमान्य टिळक –२१
वसई –१३६
ठाणे –१०
कल्याण –२०२
अंधेरी –४३
कुर्ला –१६३
कर्जत –३४
अपघाती मृत्यूची कारणे
-रुळ ओलांडण्याची सवय
-अपुऱ्या लोकल फेऱ्यांमुळे गर्दीत लटकून प्रवास
-हेडफोन लावून रेल्वे रुळ ओलांडणे
-धावती लोकल पकडण्याचा प्रयत्न
-सुरक्षा उपायांची कमतरता
-अतिमद्यपान करून प्रवास करणे
प्रवासी मृत्यूंची कारणे
-रेल्वेगाडीची धडक लागून : नऊ
-धावत्या लोकलमधून पडणे/ढकलणे : दोन
-धावत्या रेल्वेतून पडणे : एक
-रेल्वेडब्यात बेशुद्धावस्थेत सापडलेले : दोन
रेल्वे पोलिस ठाण्यातील हद्दीनुसार
पालघर ५
लोकमान्य टिळक टर्मिनस २
वसई २
ठाणे १
कल्याण १
अंधेरी १
कुर्ला १
कर्जत १
