मुंब्रा दुर्घटनेनंतर रेल्वेकडून बंद दरवाजांची लोकल, मध्य रेल्वेवर ‘नॉन-एसी’ ट्रेन लवकरच; एप्रिलमध्ये चाचणी

महामुंबईतील प्रवाशांची स्वयंचलितपणे दरवाजे बंद होणाऱ्या विनावातानुकूलित लोकलची प्रतीक्षा अखेर संपणार आहे. अशा दोन लोकल मार्चअखेर मध्य रेल्वेच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. मुंब्रा दुर्घटनेनंतर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दरवाजे बंद होणाऱ्या विना वातानुकूलित लोकलची बांधणी करण्याच्या सूचना इंटिग्रल कोच फॅक्टरीला (आयसीएफ) दिल्या होत्या. जानेवारीत याची चाचणी अपेक्षित होती. मात्र लोकलची बांधणी अपूर्ण असल्याने आता एप्रिलमध्ये तिची चाचणी होणार आहे.

जानेवारीमध्ये लोकलची घोषणा

मुंब्रा स्थानक परिसरात सीएसएमटी-कर्जत आणि कसारा-सीएसएमटी लोकलमधून आठ प्रवासी रुळांवर आणि पाच प्रवासी लोकलच्या डब्यात पडल्याची घटना ९ जून २०२५ रोजी घडली होती. यात चार प्रवाशांचा मृत्यू झाला, तर उर्वरित प्रवासी जखमी झाले होते. दुर्घटनेनंतर चेन्नईस्थित ‘आयसीएफ’मधून नोव्हेंबर २०२५ पर्यंत विनावातानुकूलित लोकलचा प्रोटोटाइप सादर होईल. त्यानंतर त्याची चाचणी घेऊन जानेवारी २०२६मध्ये ही लोकल प्रवासी सेवेत दाखल करण्याची घोषणा केली होती.

आयसीएफ’कडून १२ डब्यांच्या दोन विनावातानुकूलित लोकलची बांधणी शेवटच्या टप्प्यात आली आहे. मार्चअखेर दोन लोकल मुंबईत दाखल होणार आहेत. त्यानंतर त्यांची सर्व मार्गांवर चाचणी घेण्यात येईल. चाचणीचा अहवाल प्राप्त झाल्यावर तसेच प्रवाशांच्या प्रतिक्रियेनंतर याबाबत पुढील निर्णय घेण्यात येणार आहे, असे वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.

मुंबई उपनगरी रेल्वेगाड्यांतील गर्दी विभागण्यासाठी रेल्वे मंडळाने १५ डब्यांच्या अधिकाधिक लोकल फेऱ्या चालवण्याच्या सूचना मध्य आणि पश्चिम रेल्वेला दिल्या आहेत. लोकप्रतिनिधींकडूनही यासाठी आग्रह धरला जात आहे. धावत्या लोकलमधून पडून होणारे अपघात टाळण्यासाठी २३८ एसी लोकलची प्रक्रिया सुरू होईल. सध्या धावत्या असलेल्या एसी लोकलच्या विलंबाचा परिणाम संपूर्ण वेळापत्रकावर होतो. यामुळे विनावातानुकूलित लोकल फेऱ्यांचा प्रयोग खरोखर यशस्वी होऊन त्या सेवेत दाखल होणार की हा केवळ फार्स ठरणार, अशी चर्चा रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये सुरू झाली आहे.

हवा खेळती ठेवण्यासाठी उपाययोजना

लोकलमध्ये वातानुकूलित यंत्रणा नसल्याने, आतमध्ये हवा खेळती ठेवण्यासाठी नैसर्गिक हवेच्या प्रवाहासाठी दरवाजावर झापडे लावण्यात येणार आहे. त्याचबरोबर छतावर व्हेंटिलेटर कार्यान्वित असणार आहे. यातून हवेचा प्रवाह अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. त्याचबरोबर सर्व लोकल डब्यांची जोडणी (व्हेस्टिब्यूल) एकमेकांना करण्यात येईल. यामुळे एका ठिकाणची गर्दी विभागण्यास मदत होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *