साताऱ्यात नाट्यमय घडामोडी; अवघ्या एका मताने जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा, पण अजूनही गोंधळ सुरूच!

सातारा जिल्हा परिषदेवर अखेर भाजपचा भगवा फडकला आहे. अवघ्या एका मताने प्रिया शिंदे अध्यक्षपदी आणि राजू भोसले उपाध्यक्षपदी निवडून आले. विशेष म्हणजे नवनिर्वाचित अध्यक्षा प्रिया शिंदे या शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांच्या पत्नी आहेत. दरम्यान ही निवडणूक प्रचंड तणाव आणि पोलीस बंदोबस्तात झाली. जिल्ह्यातील सर्वच मातब्बर नेत्यांनी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. यात अखेर भाजपला यश आलं असून राष्ट्रवादी आणि शिवसेनेला पराभवाचा धक्का बसला आहे. भाजपच्या उमेदवाराचा विजय झाला असला तरी जिल्हा परिषद आवारात अजूनही गोंधळ सुरू असल्याची माहिती आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या काही सदस्यांना मतदान न करू दिल्याचा आरोप केला जात असून मंत्री शंभूराज देसाई जिल्हा परिषद इमारतीत तळ ठोकून असल्याचे समजते.

अध्यक्षपदाच्या निवडीच्या आदल्या रात्री जिल्हा परिषद सदस्यांच्या अपहरणासंदर्भात तक्रारी दाखल झाल्या. याप्रकरणी राष्ट्रवादीच्या सदस्यांना ताब्यात घेण्यासाठी पोलीस आले होते. ते सदस्य सभागृहात हजर राहू शकले नसते तर भाजपाला सहज विजय मिळवणे शक्य झाले असते. अशावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई आक्रमक झाले. त्यांनी सायरन लावून आपल्या गाडीतून सदस्यांना थेट जिल्हा परिषदेच्या आवारात आणले.

जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या उमेदवार प्रिया शिंदे यांना 33 तर मनीषा फडतरे यांना 32 मते मिळाली. अवघ्या एका मताने त्या विजयी झाल्या. उपाध्यक्षपदाचे उमेदवार राजू भोसले यांनाही 33 मते मिळाली. निवडीच्या वेळी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षाचे झाडून सगळे नेते जिल्हा परिषदेत दाखल झाले होते.

भाजपविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र निवडणूक रिंगणात उतरली. राष्ट्रवादीकडून अध्यक्षपदासाठी मनीषा फडतरे तर उपाध्यक्षपदासाठी शिवसेनेच्या अशोक पाटील यांनी अर्ज दाखल केले होते. त्यांचा एका मताने पराभव झाला. जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीच्या निमित्ताने महायुतीत सत्ता संघर्ष निर्माण झाला. तसेच नेत्यांमधील संबंध देखील ताणले गेले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *