नवीन वर्षाच्या सुरुवातीला मुंबईकरांना पश्चिम रेल्वेकडून विशेष भेट मिळणार आहे. गेली अनेक वर्ष विरार-चर्चगेट मार्गावरील प्रवाशांची मागणी अखेर पूर्ण करत प्रशासनाने 15 डब्यांच्या लोकल वाढवण्याची घोषणा केली आहे. 19 मार्च रोजी, गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर पश्चिम रेल्वेच्या 12 डब्यांच्या 16 लोकल फेऱ्यांचं रूपांतर 15 डब्यांच्या लोकलमध्ये करण्यात येणार आहे. त्यामुळे विरार-चर्चगेट मार्गावरील 16 लोकल ट्रेनची प्रवासी क्षमता वाढणार आहे.
15 डब्यांच्या लोकलमध्ये वाढ
सध्या उपनगरीय रेल्वेवर 15 डब्यांच्या एकूण 211लोकल फेऱ्या सुरू आहेत. यांची संख्या गुरूवारपासून 227 होणार आहे. एकूण फेऱ्यांची संख्या 1414 राहणार आहे. विरार-चर्चगेट-डहाणू मार्गावर लोकलला नेहमीच गर्दी असते. पीक अव्हरदरम्यान प्रवाशांना किती वेळा आपला जीव धोक्यात घालून लोकलच्या दरवाज्यावर लटकून प्रवास करावा लागतो. सध्या सुरू असलेल्या 15 डब्यांच्या लोकलची वारंवारता कमी असल्यामुळे नागरिकांना त्याचा फारसा फायदा होत नव्हता. परंतु, या वाढीव लोकल फेऱ्यांमुळे गर्दीच्या काळात प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
