मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर आज सकाळी झालेल्या भीषण अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर तीन ते चार जण किरकोळ जखमी झाले आहेत. अपघातात एकूण पाच वाहनांची धडक झाली असून, त्यामुळे महामार्गावर बराच वेळ मोठा गोंधळ निर्माण झाला होता.
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर बुधवारी सकाळी हा भीषण अपघात झाला. पुण्यावरून मुंबईला जाताना नव्या सुरू झालेल्या बोगद्याच्या खोपोलीकडील एक्झितवर हा अपघात झाला. यावेळी पाच वाहनांच्या धडकेत एक कंटेनर एका चारचाकीवर पलटल्यामुळे गाडीतील तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. सकाळी पुण्याहून मुंबईच्या दिशेने येताना 9.40 दरम्यान हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
गाडीवर कंटेनर पालटला
पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार, एका वेगवान कंटेनर चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटून पुढील वाहनांना धडक दिली. त्या नंतर पुढील सर्व वाहनं एका मागोमाग एक धडकू लागली. यावेळी एका इनोवा गाडीवर तो कंटेनर जाऊन पलटल्यामुळे हा भीषण अपघात घडला. घटनास्थळी त्वरित बोरघाट महामार्ग वाहतूक पोलीस, खोपोली पोलीस स्टेशन, डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा बल, हेल्प फाउंडेशन यांच्या टीमने बचाव कार्य सुरू केले. तसेच लोकमान्य हॉस्पिटलची ॲम्बुलन्स घटनास्थळी पोहचली असून जखमींना तातडीने वैद्यकीय मदत मिळाली.
काही काळ वाहतूक ठप्प
पोलीसांनी अपघाताची प्राथमिक कारणे तपासण्यास सुरुवात केली असून, मार्गावरील वाहतूक नियंत्रणासाठी विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. घटनास्थळी तैनात सुरक्षा व बचाव कर्मचारी नागरिकांना सुरक्षित पद्धतीने मार्गदर्शन करत आहेत. अपघाताच्या जागी मृतक आणि जखमींची माहिती गोळा करून, त्यांच्या ओळखीची पडताळणी सुरू करण्यात आली आहे. सदर अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक थांबलेली होती. पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि अपघातस्थळी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. घटनास्थळी तातडीने पोहोचलेल्या बचाव आणि सुरक्षा टीमने जखमींना रुग्णालयात हलवून त्वरित उपचाराची व्यवस्था केली.
