सातत्याने विलंबाने धावणारी मध्य रेल्वेची वातानुकूलित (एसी) लोकल आता निश्चित फलाट थांबा ओलांडल्याने पुन्हा चर्चेत आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून निघालेली कल्याण एसी लोकल मंगळवारी भांडुप स्थानकात पोहोचताना निश्चित थांबा ओलांडून दोन डबे पुढे जाऊन थांबली. यामुळे काही वेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
सीएसएमटी-कल्याण जलद एसी लोकल सकाळी ८.५६ वाजता कल्याण दिशेला रवाना झाली. घाटकोपर ओलांडल्यावर लोकलचा पुढील थांबा भांडुप स्थानकात होता. मोटरमन थांबा विसरल्याने स्थानकात प्रवेश करतानाही लोकल वेगात होती. दरम्यान, अचानक लक्षात आल्याने लोकल थांबवण्यात आली. तोपर्यंत लोकलचे दोन डबे फलाटावरील निश्चित थांबा ओलांडून पुढे गेले होते. लोकल पुढे थांबल्याने प्रवाशांमध्ये गोंधळ निर्माण झाला. अखेर फलाटापासून पुढे गेलेल्या डब्यातील प्रवासी अन्य डब्यांतून फलाटावर उतरले. सकाळी कल्याण दिशेला जाणारी लोकल असल्याने कमी गर्दी होती. यात कोणत्याही प्रवाशाला दुखापत झाली नाही.
एसी लोकलच्या मर्यादित लोकल फेऱ्या आहेत. त्यामुळे त्यांचे थांबे देखील मोजक्या स्थानकांवर आहेत. भांडुप स्थानकात थांबे असलेल्या एसी लोकलची संख्या अत्यंत कमी आहे. काही प्रवाशांनी याचे व्हिडीओ काढत समाजमाध्यमांवर पोस्ट केले. मध्य रेल्वेने याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, मध्य रेल्वेसह हार्बर मार्गावर एसी लोकल सुरू झाल्यापासून प्रवाशांना दिलासा कमी आणि त्रासच अधिक होत आहे. रोजचा विलंब, दरवाजे उघड-बंद होताना येणाऱ्या अडचणी, पूर्वसूचना न देता ऐनवेळी लोकल रद्द होणे, यांमुळे एसी लोकलचे पासधारक प्रवासी त्रासले आहेत.
