पुण्यात 12 वर्षीय मुलाचा संशयास्पद मृत्यू; शाळेतून आला, खेळण्यासाठी घराबाहेर पडला, पण नंतर थेट बॉडी आढळली!

पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात धक्कादायक घटना घडली असून सहावीत शिकणाऱ्या मुलाचा संशयास्पद मृत्यू झाल्याचं उघड झालं आहे. शिरूर तालुक्यातील दहिवडी येथील मांजरे गावात ही धक्कादायक घटना घडली. साई मांजरे असं मृत मुलाचं नाव असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, साई मांजरे हा मुलगा शाळेतून घरी आल्यानंतर कपडे बदलून खेळण्यासाठी बाहेर गेला होता. मात्र बराच वेळ होऊनही तो घरी परत आलाच नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी त्याचा शोध सुरू केला. काही वेळाने गावाजवळील शेतात त्याचा मृतदेह आढळून आला. मृतदेह आढळल्यानंतर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला. प्राथमिक तपासात साईच्या डोक्यावर गंभीर दुखापत झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे हा मृत्यू अपघाती आहे की घातपात, याबाबत अद्याप स्पष्टता झालेली नाही. घटनास्थळी वनविभागाची टीमही दाखल झाली असून सर्व बाजूंनी तपास सुरू आहे. तपासानंतर मृत्युचे नेमके कारण स्पष्ट होईल.

चिमुकल्याच्या संशयास्पद मृत्यूनंतर स्थानिक आता आक्रमक झाले आहेत. जोपर्यंत साईच्या मृत्युचे कारण स्पष्ट होत नाही, दोषी कोण हे समजत नाही, कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह जागेवरून हलवू देणार नाही अशी आक्रमक भूमिका स्थानिक ग्रामस्थ यांनी घेतली आहे.

दरम्यान, या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. या मृत्यू प्रकरणाचे गूढ उलडणार का? हा अपघात आहे की घातपात? अशा चर्चांनी जोर धरला असून पोलीस तपासानंतर याबाबतचे सत्य समोर येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *