अहिल्यानगरमधील संगमनेर परिसरात एका सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर अॅसिड हल्ला करण्यात आला. विद्यार्थिनी शाळेतून परतत असताना एका अज्ञात व्यक्तीने हा अॅसिड हल्ला केला आहे. या हल्ल्यात ती अल्पवयीन मुलगी जखमी झाली आहे. तिच्या चेहऱ्यावर अॅसिड फेकण्यात आलं. पण तेव्हा नेमकं काय घडलं? जाणून घ्या अॅसिड हल्ल्याचा संपूर्ण घटनाक्रम.
नातेवाईकांनी सांगिता घटनाक्रम
अल्पवयीन विद्यार्थिनीच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थिनीची शाळा आणि घर हे अंतर जवळपास साडे चार किमीचं आहे. विद्यार्थिनी चालत जात असताना तिच्यासोबत चुलत बहिणी देखील होत्या. मात्र कामानिमित्त त्या मागे राहिल्या आणि ही अल्पवयीन तरुणी पुढे गेली. असं असताना हा परिसर जंगल परिसर आहे. तो अज्ञात तरुण दबून बसला असावा.अल्पवयीन मुलगी पुढे आली तेव्हा त्याने तिला जाधव कुठे राहतात हे विचारलं आणि बाटलीचा वास घ्यायला लावला. आणि तीच बाटली तिच्या चेहऱ्यावर ओतली. या संपूर्ण प्रकाराने अल्पवयीन मुलगी देखील घाबरली आहे.
पीडित अल्पवयीन मुलगी काय म्हणाली?
पीडित अल्पवयीन मुलीने दिलेल्या माहितीनुसार, तो अज्ञात तरुण तिच्यासमोर आला. तिने त्याला पहिल्यांदाच पाहिलं. त्याने जाधव कुठे राहतात असं विचारलं आणि मग तिच्या अंगावर अॅसिड हल्ला केला. पीडित तरुणीच्या नातेवाईकांना दिलेल्या माहितीनुसार, ही तो अल्पवयीन मुलगा असल्याचा संशय व्यक्त केला आहे. तेलाच्या बॉटलमधून अॅसिड हल्ला केल्याच त्यांनी सांगितली.
कुठे घडली घटना?
मिळालेल्या माहितीनुसार, शाळा सुटल्यानंतर ही मुलगी घरी जात असताना अचानक समोर आलेल्या एका अज्ञात तरुणाने तिच्या चेहऱ्यावर ऍसिड फेकले.या हल्ल्यानंतर मुलीने आरडाओरड केली असता परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी अवस्थेत मुलीला त्वरित लोणी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. तिची प्रकृती गंभीर असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.दरम्यान, या हल्ल्यामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. संगमनेर ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला असून आरोपीचा शोध सुरू आहे.या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. आरोपीला तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
