बुलेट ट्रेनच्या कामांमुळे घराला तडे, रात्रभर आवाजामुळे झोपमोड; हैराण नागरिकाची हायकोर्टात धाव

‘मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पांतर्गत आमच्या घराजवळ खोदकामे होत असल्याने हादरे बसून घराचे नुकसान झाले आहे. शिवाय रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत बांधकामांना कायद्याने मनाई असूनही या वेळेत मोठे ध्वनिप्रदूषण करत काम करण्यात येत आहे’, असा आरोप करत पालघर जिल्ह्यातील वसई येथील एका रहिवासी वकिलाने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

उपाययोजना करण्याची ग्वाही

याविषयी न्या. रवींद्र घुगे व न्या. अभय मंत्री यांच्या खंडपीठाने सोमवारी प्राथमिक सुनावणी घेतली असता, नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने (NHRCL) त्या जागेवर फेरसर्वेक्षण करून आवश्यक त्या उपाययोजना करण्याची ग्वाही दिली.

या प्रकल्पाचे काम करणाऱ्या कंत्राटदार कंपनीकडून ४ फेब्रुवारीपासून चंद्रपाडा येथे काम सुरू करण्यात आले. आमच्या घरापासून सात मीटरवरच मोठ्या प्रमाणात खोदकामे होत असल्याने त्याचे हादरे घराला बसत आहेत. त्यामुळे घराला तडे गेले आहेत. शिवाय कंत्राटदाराकडून रात्री काम होत असल्याने माझ्या आजारी पालकांना त्याचा खूप त्रास होत आहे. याविषयी तक्रारी देऊनही त्याचा काहीच परिणाम झाला नाही. ‘एनएचएसआरसीएल’ला कायदेशीर नोटीस देऊनही त्रास सुरू राहिला आहे’, असे म्हणणे व्यवसायाने वकील असलेले अशोक पाखरे यांनी अॅड. निशा गायकवाड यांच्यामार्फत रिट याचिकेद्वारे मांडले आहे.

पुढील सुनावणी 30 मार्च रोजी

‘काम सुरू करण्यापूर्वी कंत्राटदाराने सर्वेक्षण केले होते. त्यावेळीही याचिकाकर्त्याच्या घराला तडे होते. पायलिंगचे काम १७ फेब्रुवारीला पूर्ण झाले. त्यानंतर काढलेल्या छायाचित्रांमध्ये तसेच तडे दिसत आहेत. तसेच कोणाचेही काही नुकसान झाल्यास ते भरून काढण्यासाठी कराराप्रमाणे कंत्राटदार कंपनी बांधील आहे. त्यादृष्टीने शहानिशा केली जाईल’, असे ‘एनएचएसआरसीएल’च्या वकिलांनी सांगितले. तेव्हा, ‘घर पडण्याची याचिकाकर्त्याची मनातील भीती कशी घालवता येईल?’, अशी विचारणा खंडपीठाने केली. त्यानंतर फेरसर्वेक्षण करून शहानिशा करत योग्य ती उपाययोजना करण्याची ग्वाही वकिलांनी दिली. त्यामुळे खंडपीठाने याविषयीची प्रगती मांडण्यास कॉर्पोरेशनला सांगून पुढील सुनावणी ३० मार्च रोजी ठेवली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *