खेळताना अचानक तोल गेला, सांडपाण्याच्या खड्ड्यात पडून सहा वर्षीय लेकराचा करुण अंत

नागपूर शहरातील वाठोडा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील शारदा नगर परिसरात एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली असून, सांडपाण्याने भरलेल्या उघड्या खड्ड्यात पडून 6 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, प्रशासनाच्या निष्काळजीपणावर संतापही व्यक्त होत आहे. मृत बालकाचे नाव दानिश अयाज अन्सारी (वय 6 वर्ष) असं आहे.

नेमकी घटना काय?

दानिश घराजवळील मोकळ्या मैदानात खेळण्यासाठी गेला होता. परिसरात सांडपाण्याने भरलेले खोल व उघडे खड्डे असल्याचं स्थानिकांनी सांगितलं. खेळताना दानिशचा तोल जाऊन तो थेट या खड्ड्यात पडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. खड्ड्यात साचलेले घाणेरडे आणि दुर्गंधीयुक्त पाणी नाका-तोंडात गेल्याने त्याचा गुदमरून जागीच मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. ही घटना इतकी अचानक घडली की, कोणालाही त्याला वाचवण्याची संधी मिळाली नाही.

सांडपाण्याच्या खड्ड्यात मृतदेह

दरम्यान, दानिश बराच वेळ घरी न परतल्याने कुटुंबीयांनी त्याचा शोध सुरू केला. नातेवाईक आणि स्थानिक नागरिकांनी मिळून परिसरात शोधमोहीम राबवली. सुमारे दोन तासांच्या अथक शोधानंतर मैदानातील सांडपाण्याच्या खड्ड्यात त्याची बॉडी आढळून आला. हा हृदयद्रावक प्रकार पाहून कुटुंबीयांनी आक्रोश केला, तर परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच वाठोडा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास वाठोडा पोलिस करत आहे.

वारंवार तक्रार करुनही…

परिसरात अनेक ठिकाणी उघडे सांडपाणी खड्डे, तुटलेली झाकणे आणि असुरक्षित जागा असल्याचे नागरिकांनी सांगितले. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात येत आहे. नागरिकांनी तातडीने सर्व उघडे खड्डे बंद करून सुरक्षितता उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. तसेच संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचीही मागणी होत आहे.

दरम्यान, ही घटना शहरातील सांडपाणी व्यवस्थेतील गंभीर त्रुटी पुन्हा एकदा अधोरेखित करणारी ठरली आहे. यापूर्वीही अशाच प्रकारच्या घटनांमध्ये लहान मुलांचा जीव गेले आहे . तरीही ठोस उपाययोजना न झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. निष्काळजीपणाची ही मोठी किंमत एका चिमुकल्याच्या जीवाने चुकवावी लागल्याने शारदा नगर परिसरात शोककळा पसरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *