मुंबईत भूमिगत वाहनतळाची मागणी, सार्वजनिक वाहनतळे 50 टक्के रिक्त, तरी रिक्त उद्यान, मैदानात उभारणीची सूचना

मुंबईत पार्किंगची समस्या दिवसेंदिवस जटील होत चालली आहे. अधिकृत पार्किंगची सुविधा असूनही अनेक वाहनमालक त्या सुविधेकडे काणाडोळा करतात आणि ‘नो पार्किंग झोन’मध्ये बिनदिक्कतपणे वाहने उभी करून वाहतुकीला अडथळा निर्माण करतात. मुंबई महापालिकेने उभारलेली सार्वजनिक वाहनतळे ५० टक्के रिक्त आहेत. तरीही अपुऱ्या पार्किंगसुविधेचे कारण पुढे करून मुंबईतील मोकळे भूखंड, उद्यान, मैदानात भूमिगत वाहनतळ उभारण्याची मागणी महापालिकेतील नगरसेवक करत आहेत. मात्र अशा पद्धतीने उद्यान, मैदाने हळूहळू मुंबईकरांच्या हातातून निसटतील, अशी भीती सर्वसामान्यांकडून व्यक्त होत आहे.

50 टक्केच प्रतिसाद

मुंबईत गेल्या काही वर्षांपासून वाहनांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे वाहनांचा वेग कमी होणे, वाहतूककोंडी यांसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते. वाढलेल्या वाहनसंख्येमुळे पार्किंगसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे महापालिकेनेही पार्किंगवर लक्ष देताना दोन ठिकाणी बहुस्तरीय रोबोटिक वाहनतळ उभारणीचे काम सुरू केले आहे. तर, शुल्क आकारून रस्त्यांलगतच्या वाहनतळासह ३४ ठिकाणी सार्वजनिक वाहनतळही सज्ज केले. मात्र महापालिकेच्या सार्वजनिक वाहनतळाला अल्प प्रतिसाद मिळत आहे. सार्वजनिक वाहनतळात दुचाकी, चारचाकी, तीनचाकी आणि अन्य लहान अवजड वाहने अशी २७ हजार २०० वाहने उभी करण्याची क्षमता आहे. मात्र या वाहनतळाला एकूण ५० टक्केच प्रतिसाद मिळत आहे.

असे असूनही शिवसेनेचे नगरसेवक वीरेंद्र शिंदे यांनी, आज, मंगळवारी १७ मार्चला होणाऱ्या महापालिका सभेत ठरावाची सूचना मांडली आहे. ‘मुंबईतील रस्त्यांवर ठिकठिकाणी वाहतूककोंडीचा प्रश्न जटील झाला आहे. शिवाय, रस्त्यावर वाहने उभी करण्यासाठी जागा अपुरी पडत आहे. नवीन इमारतींमध्ये रहिवाशांसाठी वाहन उभी करण्यासाठी वाहनतळाची व्यवस्था असली तरीही वाहनांची संख्या लक्षात घेता काही रहिवाशांना रस्त्यावर वाहने उभी करण्याशिवाय पर्याय नसतो. त्यामुळे वाहने उभी करण्याचे नवनवीन पर्याय महापालिकेने शोधण्याची गरज आहे. यासाठी मुंबईतील रिक्त भूखंड, उद्यान, मैदान अशा ठिकाणी बहुस्तरीय वाहनतळ प्रकल्प राबवण्यात यावेत.,जेणेकरून वाहनतळाची समस्या सुटेल,’ असे त्यांनी म्हटले आहे.

वाहनतळांना अल्प प्रतिसाद

मुंबई महापालिकेच्या ३४ सार्वजनिक वाहनतळांपैकी काही ठिकाणी गाड्या उभ्या करायला जागा असूनही नागरिक त्याचा वापर करत नाहीत. लोअर परळमधील ‘मुंबई टेक्स्टाईल मिल’ आणि ‘श्रीनिवास कॉटन मिल’, तसेच ‘इंडिया बुल सेंटर’ येथील वाहनतळांची क्षमता जास्त आहे. याउलट, दादर पश्चिमेकडील ‘एल्फिन्स्टन मिल’जवळ, भांडुप पश्चिमेकडील ‘व्हिलेज नाहूर’, जेकब सर्कल मौलाना आझाद मार्ग, गोरेगाव ‘पहाडी व्हिलेज’, आणि अंधेरी पूर्व ‘मरोळ व्हिलेज’ येथील वाहनतळांची क्षमता चांगली असूनही तिथे गाड्या कमी दिसतात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *