आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचे भीषण पडसाद आता थेट सर्वसामान्यांच्या खासगी आयुष्यावर आणि खिशावर उमटू लागले आहेत. छत्रपती संभाजीनगरमधील कंडोम उत्पादन उद्योगाला या जागतिक अस्थिरतेचा मोठा तडाखा बसला असून, कच्च्या मालाच्या किमतीत तब्बल ४० ते ४५ टक्क्यांनी मोठी वाढ झाली आहे. उत्पादन खर्च कमालीचा वाढल्याने येत्या काळात कंडोमच्या किमतीत १० ते १५ टक्क्यांची वाढ होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
छत्रपती संभाजीनगर हे कंडोम निर्मितीचे एक जागतिक केंद्र म्हणून ओळखले जाते. शहरातील रेमंड लाईफस्टाईल, सेफगार्ड आणि युनिव्हर्सल यांसारख्या नामांकित कंपन्यांमधून दरवर्षी १०० कोटींहून अधिक नगांची निर्मिती केली जाते. येथून केवळ भारतातच नव्हे, तर नेपाळ, आफ्रिकन देश आणि इतर परदेशांतही मोठ्या प्रमाणावर पुरवठा केला जातो. मात्र, आखाती देशांतील युद्धामुळे या उत्पादनासाठी लागणारे सिलिकॉन ऑइल, पॅकेजिंग मटेरियल आणि ॲल्युमिनियम लॅमिनेट यांसारख्या साहित्याचा पुरवठा विस्कळीत झाला आहे.
केमिकलच्या दरात प्रचंड दरवाढ
उद्योगातून समोर आलेल्या माहितीनुसार, यापूर्वी १८० रुपये किलो दराने मिळणारे केमिकल आता थेट २७० रुपयांवर पोहोचले आहे. कच्च्या मालाचे दर अशा प्रकारे गगनाला भिडल्यामुळे उत्पादन साखळीवर मोठा आर्थिक ताण येत आहे. आखाती मार्गाने होणारी वाहतूक खर्चिक आणि जोखमीची झाल्याने कंपन्यांचा उत्पादन खर्च ४५ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. हा वाढलेला बोजा कमी करण्यासाठी कंपन्यांना आता उत्पादनांच्या किमती वाढवण्याशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही.
कुटुंब नियोजन साधनांवर परिणाम होण्याची भीती
कंडोमच्या किमतीत होणारी १० ते १५ टक्क्यांची वाढ ही सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावणारी ठरणार आहे. विशेषतः आरोग्य आणि कुटुंब नियोजनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या साधनाचे दर वाढल्याने, त्याचा वापरावर परिणाम होतो का, अशी चिंता आता व्यक्त केली जात आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील ही अस्थिरता अशीच कायम राहिली, तर केवळ दर वाढणार नाहीत तर उत्पादनातही मोठी घट होण्याची भीती उद्योजकांकडून व्यक्त केली जात आहे.
