चार दशकांपासून चर्चेत असलेल्या बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाला अखेर वेग मिळाला असून नायगाव येथील प्रकल्पातील ८६४ पुनर्वसन सदनिकांचे वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले. १५ हजार ५९३ पुनर्वसन घरांची उभारणी पूर्ण करून डिसेंबर २०२९पर्यंत सर्व लाभार्थ्यांना घरे देण्याचे उद्दिष्ट राज्य सरकारने ठेवले असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
5 टॉवर तयार
म्हाडामार्फत वरळी, नायगाव आणि ना. म. जोशी मार्ग परळ येथे बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प राबविण्यात येत आहे. नायगाव येथील प्रकल्पाचे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर बीडीडी संकुल’ असे नामकरण करण्यात आले असून दोन पुनर्वसन इमारतींमध्ये २० टॉवर उभारले जाणार आहेत. पहिल्या टप्प्यातील आठ टॉवरपैकी पाच टॉवरमधील ८६४ सदनिकांचे वितरण करण्यात आले.
बीडीडी चाळ पुनर्विकासाचा विषय दीर्घकाळ प्रलंबित होता. विविध तांत्रिक अडचणी आणि मतभेदांमुळे प्रकल्प रखडला होता. त्यामुळे हा प्रकल्प बिल्डरांच्या भरोशावर न ठेवता सरकारने स्वतः हाती घेऊन म्हाडामार्फत राबविण्याचा निर्णय घेतला. नव्या इमारतींमध्ये अत्याधुनिक सुविधा देण्यात आल्या असून रहिवाशांच्या जीवनमानात मोठा बदल घडेल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी नायगाव परिसरातील भवानी माता मंदिरासाठी ९०० चौरस फुट जागा उपलब्ध करून देण्याची घोषणाही केली.
500 सदनिका मोफत
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ‘बीडीडी चाळीत वर्षानुवर्षे वास्तव्यास असलेल्या रहिवाशांना ५०० चौरस फुटांची अत्याधुनिक सदनिका विनामूल्य देण्यात येत आहे. या प्रकल्पामुळे मुंबईच्या हृदयस्थानी रहिवाशांना हक्काचे घर मिळत आहे. पुनर्वसन इमारतींची १२ वर्षे देखभाल म्हाडातर्फे करण्यात येणार आहे.’
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही हा क्षण रहिवाशांसाठी ऐतिहासिक असल्याचे नमूद केले. अनेक वर्षे १६० चौरस फुटांच्या खोलीत राहिलेल्या कुटुंबांना आता ५०० चौरस फुटांची आधुनिक सदनिका मिळत असून यंदाचा गुढीपाडवा ते नव्या घरात साजरा करणार असल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला. याप्रसंगी बोलताना आमदार कालिदास कोळंबकर यांनी स्थानिकांच्या मागण्या मांडल्या.
