भल्या पहाटे घरी जाताना आक्रित घडलं, भटक्या कुत्र्यांचा जीवघेणा हल्ला; पुण्यात महिलेचा दुर्दैवी अंत

पुण्यातील चाकण परिसरात काल रविवारी पहाटे अंगावर काटा येईल अशी भयंकर घटना घडली. रात्रीच्या अंधारात शांत आणि सामसूम रस्त्यावरून एक महिला चालत जात असताना अचानक भटक्या कुत्र्यांनी तिच्यावर हल्ला केला. काही क्षणातच परिस्थिती भयावह झाली. महिलेने स्वतःचा जीव वाचवण्यासाठी धडपड केली, दगड उचलून कुत्र्यांना हुसकावण्याचा प्रयत्नही केला; पण कुत्र्यांच्या हल्ल्यासमोर ती पूर्णपणे हतबल ठरली. काही मिनिटांतच हा प्रसंग थरारक आणि दुर्दैवी शेवटाकडे वळला. कुत्र्यांच्या या भयावह हल्ल्यात त्या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, शोभा विजय वाघमारे असं मृत महिलेचं नाव आहे. त्या मूळच्या नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथील रहिवासी असून सध्या चाकण परिसरात वास्तव्यास होत्या. काल रविवारी पहाटे साधारण दोन वाजेच्या सुमारास त्या आंबेठाण चौकाजवळील उड्डाणपुलाखालून सर्व्हिस रोडने जात होत्या. रस्ता जवळपास ओस पडलेला होता. त्याचवेळी अचानक भटक्या कुत्र्यांनी त्यांच्यावर झडप घातली. कुत्रे सतत भुंकत त्यांच्याभोवती फिरू लागले आणि काही क्षणातच त्यांनी हल्ला चढवला. घाबरलेल्या महिलेनं दगड उचलून कुत्र्यांना दूर करण्याचा प्रयत्न केला. मात्र, कुत्रे अधिकच आक्रमक झाले आणि कुत्र्यांनी त्यांच्या हात, पाय, मान आणि चेहऱ्यावर चावा घेत त्यांना गंभीर जखमा केल्या.

सीसीटीव्ही कॅमेऱ्यात सर्वच कैद

या भीषण हल्ल्यात त्यांचा मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. अवघ्या काही मिनिटातच महिला रस्त्यावर कोसळली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. या संपूर्ण घटनेचे काही दृश्ये परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याचे सांगितलं जात आहे. सकाळी नागरिकांना रस्त्याच्या कडेला महिलेचा मृतदेह आढळल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली. सुरुवातीला या घटनेबाबत विविध तर्क लावले जात होते. मात्र, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यातच हा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं. या घटनेमुळे चाकण परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या त्रासाबाबत नागरिकांनी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *