दुपार झाली तरी दार बंद, शेजाऱ्यांनी दरवाजा तोडला तर दाम्पत्याची बॉडी आढळली; PM रिपोर्टमध्ये मोठी माहिती

सोलापूर शहरातील स्वागतनगरकडे जाणाऱ्या रस्त्यालगतच्या कृष्णानगर येथे महादेव नरसप्पा मंचाळ (वय 68) आणि त्यांच्या पत्नी रंगम्मा मंचाळ (वय 62) या वृद्ध दाम्पत्याची हत्या झाल्याची घटना घडली आहे. दुहेरी हत्येच्या या घटनेनं सोलापुरात मोठी खळबळ उडाली आहे. श्वासोच्छवास रोखून वृद्ध पती-पत्नीची हत्या करण्यात आल्याचा एमआयडीसी पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. जागेच्या वादातून मंचाळ यांच्या भावकीत मागील अनेक दिवसांपासून टोकाचा वाद सुरु होता. त्यावरुन ही हत्या झाली असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, पोलिसांनी सखोल तपास सुरू केला असून आणखी आरोपी निष्पन्न झाला नाहीय. काल रविवारी रोजी रात्री उशीरापर्यंत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात कारण व व्यक्ती यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वृद्ध दाम्पत्याने घराचा दरवाजा उघडला नव्हता

कृष्णानगरमध्ये काल रविवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास दुहेरी हत्याकांडाची घटना उघडकीस आली आहे. दररोज सकाळपासून दिसणारी मंचाळ आजी दुपार झाली तरी दिसत नव्हती. मंचाळ दाम्पत्याने दुपार झाली तरी दरवाजा का उघडला नाही, अशी शंका आल्यानंतर शेजाऱ्यांनी दार ठोठावून पाहिलं. मात्र, आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आजूबाजूच्या शेजाऱ्यांची शंका अधिकच बळावली. पुढच्या काही क्षणात शेजाऱ्यांनी मंचाळ यांच्या घराचा दरवाजा तोडून पाहिलं असता महादेव मंचाळ आणि त्यांच्या पत्नी रंगम्मा मंचाळ हे वृद्ध दाम्पत्य मृतावस्थेत दिसलं. हे दृश्य पाहून शेजाऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकली.

दोघांचे मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवले

घटनेची माहिती मिळताच, एमआयडीसी पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. पोलीस निरीक्षक विजय खोमणे आणि त्यांच्या टीमने घटनेचा पंचनामा करुन दोघांचे मृतदेह येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले. काल रविवारी सांयकाळनंतर मृतदेह अंत्यसंस्कारसाठी नातेवाईकांच्या ताब्यात दिल्याचं पोलीस सुत्रांकडून सांगण्यात आलं.

गुदमरुन मृत्यू; शवविच्छेदन अहवालात माहिती

मृत महादेव मंचाळ आणि त्यांची पत्नी रंगम्मा मंचाळ यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल पोलिसांना प्राप्त झाला असून दोघांचा श्वासोच्छवास रोखण्यात आला होता आणि, त्यातून त्यांचा गुदमरुन मृत्यू झाला, असं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

श्वासोच्छवास रोखला गेला

महादेव आणि त्यांच्या पत्नी रंगम्मा यांचा श्वासोच्छवास रोखला गेला होता. यातच त्यांचा मृत्यू झाला आहे, असं शवविच्छेदन अहवालात नमूद केलं आहे. वृद्ध मंचाळ पती पत्नीचा श्वास नेमका रोखला कोणी? तोंडावर उशी किंवा अन्य काही ठेवले का? हे कृत्य कोणी केलं असावं? यादृष्टीने एमआयडीसी पोलिसांचा तपास सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *