डोंबिवलीत गॅस कनेक्शन अपडेटच्या नावाखाली फसवणुकीची दुसरी घटना; व्यापाऱ्याचे 14 लाख लुबाडले

तुमच्या घरातील महानगर गॅसचे जुने कनेक्शन बंद होणार असून नवीन कनेक्शनसाठी आधी ऑनलाईन माध्यमातून १२ रुपये पाठवा, असे सांगत सायबर गुन्हेगाराने डोंबिवलीतील एका कपडा व्यापाऱ्याची तब्बल १४ लाखांहून अधिक रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. डोंबिवली पूर्वेतील गोपाळनगरमध्ये राहणाऱ्या एका कपडा व्यापाऱ्याला सायबर गुन्हेगाराने फोन करून ही माहिती दिली होती. हा बनावट इसम असल्याचा संशय आल्याने व्यापाऱ्याने त्याला पैसे पाठवले नाहीत. मात्र त्याच दिवशी रात्री व्यापाऱ्याच्या बँक खात्यातून वेगवेगळ्या आठ व्यवहारांद्वारे १४ लाख ४७ हजार रुपयांची रक्कम काढून घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.

आधीही घडली होती अशीच घटना

गेल्याच आठवड्यात डोंबिवलीतील एका महिलेलाही महानगर गॅसचे देयक भरले नसल्याचे सांगत भामट्याने ऑनलाईन माध्यमातून मोठी रक्कम उकळल्याची घटना ताजी असतानाच आता ही दुसरी घटना घडली आहे. अरुण असे फसवणूक झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे.

“महानगर गॅसमधून बोलतोय” सांगत संपर्क

अरुण यांनी टिळकनगर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, गेल्या महिन्यात संध्याकाळच्या सुमारास दिनेश जोशी नावाच्या इसमाने त्यांना फोन केला. “मी महानगर गॅसमधून बोलत असून आपल्या भागात नवीन गॅस वाहिनी टाकायची आहे. त्यामुळे तुमचे सध्याचे गॅस कनेक्शन बंद होणार आहे. या प्रक्रियेसाठी आधी ऑनलाईन माध्यमातून १२ रुपये पाठवा,” असे तो सांगू लागला. हा बनावट इसम असावा असा संशय आल्याने अरुण यांनी कोणतीही बँक माहिती दिली नाही.

दोन दिवसांनी पुन्हा फोन

दोन दिवसांनी रात्रीच्या वेळेत पुन्हा दिनेश जोशी याने संपर्क साधून १२ रुपये ऑनलाईन पाठविण्याची गळ घातली. त्यावर अरुण यांनी “मला पुन्हा संपर्क करू नका, अन्यथा पोलिसांत तक्रार करीन,” अशी तंबी देत त्याचा मोबाईल बंद केला.

खात्यातून १४ लाखांहून अधिक रक्कम गायब

मात्र त्यानंतर रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास अरुण यांच्या मोबाईलवर खात्यातून पैसे काढल्याचे संदेश येऊ लागले. वेगवेगळ्या आठ बँक व्यवहारांद्वारे १४ लाख ४६ हजार ९८९ रुपयांची रक्कम खात्यातून काढून घेतल्याचे समोर आले. आपण कोणतेही व्यवहार केले नसतानाही खात्यातून पैसे वळते झाल्याने अरुण यांना मोठा धक्का बसला.

पोलिसांत तक्रार; तपास सुरू

दोन दिवस सतत संपर्क करणाऱ्या दिनेश जोशी नावाच्या व्यक्तीवर संशय व्यक्त करत त्यानेच ऑनलाईन माध्यमातून आर्थिक फसवणूक केल्याची तक्रार अरुण यांनी टिळकनगर पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. दरम्यान, या प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *