रुग्नालयातील ICU वॉर्डातील घटना, 89 वर्षीय महिलेचा उंदरांनी कुरतडला हात

आजारी व्यक्तीला रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याची काळजीपूर्वक सेवा केली जाईल, अशी अपेक्षा कुटुंबीयांची असते. मात्र मिरा भाईंदरमधील एका रुग्णालयात उपचार घेत असलेल्या वृद्ध महिलेसोबत घडलेली घटना ऐकून अनेकजण संताप व्यक्त करत आहेत. आयसीयूसारख्या संवेदनशील विभागातही अशी घटना कशी घडली, याबाबत आता चर्चा सुरू झाली आहे. या प्रकारामुळे रुग्णालय प्रशासनाच्या कामकाजाबाबत प्रश्न उपस्थित होत असून नातेवाईकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

मिरा भाईंदरमधील रुग्णालयात धक्कादायक घटना

मिरा भाईंदर पश्चिम येथील ‘पंडित भीमसेन जोशी रुग्णालय’ येथे हा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे. रुग्णालयाच्या आयसीयू विभागात उपचार सुरू असताना 89 वर्षीय महिलेसोबत घडलेल्या या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे

माहितीनुसार ‘सुहासिनी माठेकर’ वय 89 यांना 12 मार्च रोजी प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांना रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावरील अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. डॉक्टरांकडून त्यांच्यावर आवश्यक वैद्यकीय उपचार केले जात होते.

आयसीयू विभागात उंदराचा उच्छाद

मात्र रात्रीच्या वेळी अत्यंत धक्कादायक प्रकार घडल्याचे नातेवाईकांनी सांगितले. आयसीयू सारख्या सुरक्षित विभागात असतानाही एका उंदराने त्यांच्या हाताला कुरतडल्याचा आरोप करण्यात आला आहे. रुग्णालयातील स्वच्छता आणि सुरक्षिततेबाबत त्यामुळे गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

सकाळी नातेवाईकांनी पाहिला प्रकार

सकाळी सुमारे 6 वाजता नातेवाईक त्यांना भेटण्यासाठी आयसीयू बाहेर आले असता हा प्रकार त्यांच्या लक्षात आला. त्या वेळी हाताजवळ उंदीर दिसला आणि तो लगेच पळून गेला, असे कुटुंबीयांनी सांगितले. त्यानंतर त्यांनी रुग्णालय प्रशासनाकडे याबाबत नाराजी व्यक्त केली.

डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर प्रश्न

कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, रात्रीच्या वेळी ड्युटीवर असलेल्या डॉक्टर किंवा नर्स यांना हा प्रकार लक्षात आला नव्हता. आयसीयूमध्ये सामान्य व्यक्तींना प्रवेश नसताना उंदरांचा वावर कसा काय झाला, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

रुग्णालयाच्या व्यवस्थेवर संताप

या घटनेनंतर रुग्णालयाच्या व्यवस्थापनावर हलगर्जीपणाचा आरोप केला जात आहे. आयसीयू सारख्या महत्त्वाच्या विभागात स्वच्छता आणि सुरक्षा राखली गेली पाहिजे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करावी, अशी मागणीही आता पुढे येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *