पुण्यामध्ये प्रेमप्रकरणामधून एका 23 वर्षीय तरुणाची प्रेयसीच्या नातेवाईकांनी निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मयत तरुणाचं नाव नागेश जाधव असं असून या प्रकरणामध्ये पोलिसांनी दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पोलीस तपास करत असून सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, नागेशला त्याच्याच प्रेयसीच्या मोबाईलवरुन मेसेज करुन भेटण्यासाठी ये सांगत बोलवण्यात आल्यानंतर त्याच्यावर हल्ला करण्यात आला. या प्रकरणामध्ये कोथरुड पोलिसांनी दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. नागेशच्या नातेवाईकांनी सर्व आरोपींना तातडीने अटक करावी अशी मागणी केली आहे.
नागेश कोण आणि हे प्रकरण का घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, नागेश जाधव शिवाजीनगरमध्ये ऑफिस बॉय म्हणून काम करायचा. शनिवारी सायंकाळी प्रेमप्रकरणावरुन प्रेयसीच्या नातेवाईकांसोबत झालेल्या वादात त्याच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. प्रेयसीच्या अनेक नातेवाईकांनी बेदम मारहाण करत नागेशचा जीव घेतला. नागेशची आई घरकाम करते. प्राथमिक माहितीनुसार, नागेशचे एका मुलीशी प्रेमसंबंध होते. नागेश आणि या मुलीच्या प्रेमसंबंधांना प्रेयसीच्या कुटुंबाने विरोध केला. हे प्रकरण एकतर्फी प्रेम किंवा कौटुंबिक वादातून उद्भवल्याची प्राथमिक शक्यता व्यक्त केली जात आहे.
बेदम मारहाण करण्यात आली
शनिवारी सायंकाळी नागेशला एक फोन आल्यानंतर तो घरुन मी जाऊन येतो म्हणत बाईकवरुन निघाला. त्याला त्याच्या मैत्रिणीच्या मोबाईलवरुन सायंकाळी आठच्या सुमारास भेटायला येण्यासंदर्भात विचारणा करणारा मेसेज आला होता. नेमकं कुठे भेटायला यायचं हे ही मेसेजमध्ये सांगण्यात आलेलं. नागेश त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर त्याच्या मैत्रिणीच्या कुटुंबातील सदस्यांनी त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला. नागेशला सर्व आरोपींनी बेदम मारहाण केली. या मारहाणीतच नागेश गंभीर जखमी झाला.
मुलाला मारहाण केल्यानंतर आईला केला फोन अन्…
सध्या हाती आलेल्या माहितीनुसार, नागेशला मारहाण केल्यानंतर त्याच्याच मोबाईलवरुन त्याच्या आईला फोन करुन वाटेल त्या शब्दांमध्ये नागेशच्या आईचा अपमान आरोपींनी केला. “त्याला मारुन टाकलं आहे. इथून त्याला घेऊन जाऊ नकोस,” अशी धमकी आरोपींनी नागेशच्या आईला फोनवरुन दिली.
हत्येचा गुन्हा दाखल
राग शांत झाल्यानंतर आरोपी घटनास्थळावरुन पळून गेले. त्यानंतर जखमी अवस्थेतील नागेशला रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण उपचारादरम्यान नागेशचा मृत्यू झाला. नागेशच्या आईने पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली असून पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलिसांनी पुढील तपास सुरू केला असून आरोपींचा शोध घेत आहेत.
